योगेश पांडे/ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि.18 - वंचित समाजातील कुणावरही अन्याय होऊ नये यासाठी ‘अॅट्रोसिटी’ कायदा अस्तित्वात आला. परंतु जर ‘अॅट्रोसिटी’चा गैरवापर होत असेल तर ते अयोग्य आहे. असे प्रकार करणा-यांवर कारवाई झाली पाहिजे. या कायद्याचा गैरवापर का होतो आहे हेदेखील शोधले गेले पाहिजे, असे मत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, सांस्कृतिक कार्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध पुरस्कारप्राप्त विद्यार्थ्यांचा रविवारी सन्मान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमस्थळी मंजुळे यांनी हे वक्तव्य केले.
‘अॅट्रोसिटी’ कायदा रद्द व्हावा अशी मागणी होत आहे. या कायद्याचा गैरवापर का होत आहे, याबाबत नीट चौकशी व्हावी. ‘अॅट्रोसिटी’ कायदा रद्द झाला तर परिस्थितीत खरेच किती फरक पडेल याबाबतदेखील सखोल अभ्यास व्हावा, असे नागराज मंजुळे म्हणाले.
रामदास आठवले गमतीचा भाग
मराठा समाजाच्या आक्रोशाला ‘सैराट’ चित्रपट जबाबदार असल्याचे वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले होते. याबाबत मंजुळे यांना विचारणा केली असता रामदास आठवले हे गमतीचा भाग आहेत, असे म्हणून मंजुळे यांनी या विषयावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.