विधानभवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी : जयंत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:53 PM2021-07-06T12:53:49+5:302021-07-06T13:00:58+5:30
Maharashtra Assembly 2021: विरोधकांकडून भरवण्यात आली होती विधानभवनाच्या परिसरात प्रति विधानसभा. सत्ताधाऱ्यांकडून यावर कारवाईची मागणी.
"मागच्या काळात आम्हीही विरोधी पक्षात होतो मात्र आम्ही कधीही विधानभवनाच्या आवारात अशी वागणूक केली नाही. विधान भवनाच्या आवारात चुकीची वागणूक करणाऱ्या विरोधी सदस्यांवर कारवाई करण्यात यावी," अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज विधानसभा अध्यक्षांकडे केली.
आज राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस असून भाजपच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायर्यांवर बसून प्रती विधानसभा निर्माण करण्याच्या प्रयत्न केला त्यावर जयंत पाटील यांनी विरोधी सदस्यांच्या वर्तणुकीवर आक्षेप घेतला. धानसभेत बऱ्याच महत्त्वपूर्ण गोष्टी कामकाजात आहेत. मात्र, विरोधी पक्षातील सदस्य सभागृहात उपस्थित न राहता विधानभवनाच्या आवारात गोंधळ घालत आहेत. विरोध करण्यास मनाई नाही, मात्र लाऊडस्पीकर लावले जात आहे हे अयोग्य आहे असेही जयंत पाटील यांनी अध्यक्षांच्या निदर्शनास आणून दिले.
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा
विधिमंडळ अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. या कृतीवरून विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. विधान भवन परिसरात कुठल्याही संविधानिक कामकाजाशिवाय इतर कामकाज होऊ शकत नाही. विरोधी पक्षांचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु स्पीकर लावून भाषणबाजी करणं यासाठी विधानभवन परिसराचा राजकीय वापर केला जातोय असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
काय म्हणाले भास्कर जाधव?
"विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्यात येते. स्पीकर लावले जातात. प्रत्येक वेळेला राजकारण केले जाते. आमचं केंद्रात सरकार आहे, आम्ही बोलू तसं वागू. मार्शल लावून या सगळ्यांना आवाराच्या बाहेर काढा असं माझं मत आहे. सभागृहात बसायचं नाही, महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडायचे नाही. आम्ही म्हणू ते करू, याला आत टाकू त्याला आता टाकू. ज्या गावच्या बाभळी त्या गावच्या बोरी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायलाच हवी," अशी मागणी त्यांनी केली.
सरकारचा बुरखा फाडू – देवेंद्र फडणवीस
"मार्शल पाठवून पत्रकारांवर दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न केला गेला. आजचं अधिवेशन सुरु करतील. लोकशाहीच्या दोन्ही स्तंभांना कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जात आहे. ज्यापद्धतीने सरकारने १२ आमदारांचे निलंबन केले. हे सरकार शेतकरी, ओबीसी, मराठा समाजाविरोधात आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. खोटारडे आरोप लावून भाजपा आमदारांचे निलंबन केले गेले. प्रतिविधानसभा भरवली असताना माध्यमांचे कॅमेरा जप्त करण्यात आले. या सरकारचा बुरखा फाडण्याचं काम आम्ही करू, जनतेसमोर जाऊन आम्ही सरकारला उघडं पाडू," असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.