ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11- नालेसफाई घोटाळ्यानंतर आता रस्ते घोटाळाप्रकरणातही अभियंत्यांना अटक झाल्याने मुंबई महापालिकेतील अभियंत्यांमध्ये अस्वस्था पसरली आहे. कोणत्याही घोटाळ्यात वरिष्ठ अधिकारी नामनिराळे राहत असून अभियंत्यांच्याच गळ्याभोवती फास आवळला जात असल्याने अभियंतावर्ग हवालदिल झाला आहे़ त्यामुळे अभियंत्यांनी आपली ताकद दाखवून देण्यासाठी २० जुलैपासून काम बंद आंदोलनाची तयारी केली आहे़ याचा फटका अत्यावश्यक सेवांनाही बसण्याची शक्यता आहे़ रस्ते, पाणी, शहर नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, इमारत प्रस्ताव अशा सर्व विभागांची सुत्रे अभियंत्यांच्या हाती असतात़ मात्र गेल्या काही वर्षांमध्ये कोणत्याही दुर्घटना अथवा घोटाळ्यानंतर वातावरण निवळण्यासाठी अभियंत्यांनाच सुळावर चढविले जात असल्याचा आरोप अभियंत्यांकडून होऊ लागला आहे़ सध्या गाजत असलेल्या रस्ते घोटाळ्यात दक्षता खात्याचे प्रमुख अभियंता उदय मुरुडकर आणि रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोक पवार यांना अटक करण्यात आली आहे़ याप्रकरणाचे तीव्र पडसाद अभियंत्यांमध्ये उमटू लागले आहेत़ एखाद्या प्रकरणाची चौकशी सुरु असतानाच त्यात वरिष्ठ अधिकाऱ्याचे पद धोक्यात आल्यास अभियंत्यांना निलंबित केले जाते़ घोटाळ्याचा सुत्रधार ठेकेदार असला तरी त्याच्यविरोधात कोणतीच कारवाई केली जात नाही़ अभियंत्यांना मात्र चौकशी पूर्ण होण्याआधीच निलंबन व अटक होऊन मानहानीचा सामना करावा लागतो, अशी खंत अभियंत्यांनी व्यक्त केली़ प्रतिनिधी चौकट अत्यावश्यक सेवांना टाळे मुंबई महापालिकेच्या प्रमुख विभागांची सुत्रे अभियंत्यांकडे असतात़ महापालिकेत चार हजार तीनशे अभियंता आहेत़ अत्यावश्यक पाणी खात्यातही अभियंताच प्रमुख आहे़ त्यामुळे संतप्त अभियंत्यांनी काम बंद आंदोलन पुकारुन अत्यावश्यक सेवांनाच टाळे लावण्याचा इशारा दिला आहे़ अभियंत्यांनी आझाद मैदानावर आज मोर्चा आणून आपली नाराजी आज दाखवून दिली असल्याचे, बृहन्मुंबई महानगरपालिका अभियंता कृती समितीचे पदाधिकारी यशवंत धुरी यांनी सांगितले़ या प्रकरणात अभियंता निलंबित व अटक डॉकयार्ड येथील पालिकेची वसाहत कोसळून ६१ जण मृत्युमुखी पडले़ याप्रकरणात वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इमारती दुुरुस्तीची फाईल पुढे सरकविण्यासाठी विलंब केल्यामुळे हा अपघात झाल्याचा ठपका चौकशीतून ठेवण्यात आला होता़ मात्र या अधिकाऱ्याचा कार्यकाळ पूर्ण होताच त्यांची बदली झाली़ मात्र मंडई, इमारत प्रस्ताव या विभागाचे अभियंता गजाआड झाले़ * * अल्ताफ मंजील या इमारत दुर्घटनेनंतरही अभियंत्यांनाच निलंबित करण्यात आले़ * नालेसफाई घोटाळाप्रकरणात १४ अभियंत्यांना निलंबित करण्यात आले़ ठेकेदार मात्र मोकाट आहेत़ रस्ते घोटाळ्याच्या चौकशीत काय़़ * रस्त्यांच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचे आढळून आले होते़ ३५२ कोटी रुपयांच्या या घोटाळ्यात जबाबदार ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस चौकशी समितीने केली आहे़ मात्र ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही त्यांना करोडो रुपयांचे कंत्राट मिळाले़ उच्च न्यायालयाने याप्रकरणात सुनावणीनंतर हे कंत्राट रद्द केले़ तर रस्ते विभागाचे तत्कालिन प्रमुख अभियंता अशोक पवार आणि दक्षता खात्यातील अधिकारी उदय मुरुडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे़ या अधिकाऱ्यांची घोटाळ्यात भूमिका काय, किती कोटींचा त्यांनी अपहार केला, हे चौकशीतून पुढे येण्याआधीच ही कारवाई झाल्याचा आरोप कृती समितीने केला आहे़ बदली झाल्यामुळे वरिष्ठ अधिकारी बचावले रस्त्यांच्या कामासाठी निविदेचे निकष ठरविताना त्यात गंभीर स्वरुपाची त्रुटी ठेवण्यात आल्याचे या चौकशीतून आढळून आले आहे़ त्यामुळे वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्याची जबाबदारी निश्चित करावी, अशी शिफारस या अहवालातून करण्यात आली आहे़ मात्र रस्ते खात्याची जबाबदारी असलेले तत्कालिन अतिरिक्त आयुक्त एस़व्ही़श्रीनिवास यांची बदली होऊन ते महापालिकेतून गेले़