जुन्नर : श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान असलेल्या वडज (ता. जुन्नर) येथे बैलगाडा शर्यतीवर बंदी असतानादेखील रविवारी दुपारी शर्यती भरविण्यात आल्या. या प्रकरणी जुन्नर पोलीस घटनास्थळी गेल्यानंतर आयोजकांनी बैलगाडा शर्यती बंद करून पोबारा केला. बैलगाडा शर्यतीप्रकरणी प्रत्यक्षदर्शनी दिलेल्या महितीप्रमाणे जुन्नर तालुक्यातील वडगाव सहानी येथे बैलगाडा शर्यती भरविण्यात येणार होत्या.मात्र, वडगाव सहानी येथील शर्यतीचे ठिकाण बदलून अचानकपणे वडज येथील घाटावर बैलगाडा शर्यती भरविण्यात आल्याचे समजले. वडज येथे श्री कुलस्वामी खंडेराय देवस्थान असून पूर्वी या ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा शर्यती भरविल्या जात होत्या. मात्र शर्यंतीना बंदी असल्याने वडज येथे शर्यतीचे आयोजन होत नव्हते. मात्र रविवार ५ रोजी अचानकपणे बैलगाडा शर्यती अज्ञातांनी आयोजित केल्याचे समजले. बैलगाडा शर्यतीचा आनंद घेण्यासाठी जवळपास सातशेहून अधिक बैलगाडा शर्यत शौकीन यावेळी उपस्थित होते. चाकण, मंचर, कबाडवाडी, निमदरी, वडगाव सहानी, वैष्णवधाम, सावरगाव यासह अन्य भागातून जवळपास शंभरहून अधिक बैलगाडा शौकिन उपस्थितीत होते. जुन्नर पोलीस ठाण्याला याबाबत माहिती मिळाल्यावर जुन्नरचे पोलीस निरीक्षक कैलास घोडके, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच बैलगाडा शर्यती बंद करण्यात आल्या. पोलीस येत असल्याचे समजताच आयोजक व सहभागी यांनी बैलगाडा घाटावरून पोबारा केला. पोलिसांनी बैलगाडा शर्यतीचे तसेच लाऊड स्पीकर व मंडप साहित्य जप्त केले. दरम्यान, जुन्नर पोलीस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बंदी झुगारून वडजला बैलगाडा शर्यती, जुन्नर पोलिसांनी केली कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2017 10:38 PM