मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने गुरुवारी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे केली आहे. शिवसेनेने बोलाविलेल्या बैठकीला हे सदस्य उपस्थित नसल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. यानंतर आज आणखी चार आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. आमदार सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांच्या विरोधात देखील शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
सदा सरवणकर हे मुंबईच्या माहिम मतदारसंघातून विधानसभा आमदार आहेत. ते दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलताना दिसले होते. नंतर ते एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाले. तर प्रकाश आबिटकर हे कोल्हापूरच्या राधानगरी मतदारसंघातून आमदार आहेत. संजय रायमूलकर हे बुलढाण्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून निवडून गेले आहेत, तर रमेश बोरनारे औरंगाबादच्या वैजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. शिवसेनेला खिंडार पाडत एकनाथ शिंदे यांनी ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत. यामुळे शिवसेनेकडून बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येत आहे. शिवसेनेने काल १२ आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे, असे पत्र विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पाठवले होते. आता सदा सरवणकर, प्रकाश आबिटकर, संजय रायमूलकर आणि रमेश बोरनारे यांचे देखिल सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.
शिवसेनेकडून सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आलेले आमदार... १) एकनाथ शिंदे, २) अब्दुल सत्तार, ३) संदीपान भुमरे, ४) प्रकाश सुर्वे, ५) तानाजी सावंत, ६) महेश शिंदे, ७) अनिल बाबर, ८) यामिनी जाधव, ९) संजय शिरसाट, १०) भरत गोगावले, ११) बालाजी किणीकर, १२) लता सोनावणे, १३) सदा सरवणकर, १४) प्रकाश आबिटकर, १५) संजय रायमूलकर, १६) रमेश बोरनारे.
एकनाथ शिंदेंसोबत असलेले शिवसेनेचे आमदार१) एकनाथ शिंदे २) अनिल बाबर ३) शंभूराजे देसाई ४) महेश शिंदे ५) शहाजी पाटील ६) महेंद्र थोरवे, ७) भरत गोगावले ८) महेंद्र दळवी, ९) प्रकाश आबिटकर १०) डॉ. बालाजी किणीकर ११) ज्ञानराज चौगुले १२) प्रा. रमेश बोरनारे १३) तानाजी सावंत १४) संदीपान भुमरे १५) अब्दुल सत्तार १६) प्रकाश सुर्वे १७) बालाजी कल्याणकर १८) संजय शिरसाठ १९) प्रदीप जयस्वाल २०) संजय रायमुलकर २१) संजय गायकवाड २२) विश्वनाथ भोईर २३) शांताराम मोरे २४) श्रीनिवास वनगा २५) किशोर पाटील २६) सुहास कांदे २७) चिमणराव पाटील २८) लता सोनावणे २९) प्रताप सरनाईक ३०) यामिनी जाधव ३१) योगेश कदम ३२) गुलाबराव पाटील ३३) मंगेश कुडाळकर ३४) सदा सरवणकर ३५) दीपक केसरकर ३६) दादा भुसे ३७) संजय राठोड.
अपक्ष व लहान पक्षांचे आमदार१) बच्चू कडू २) राजकुमार पटेल ३) राजेंद्र यड्रावकर ४) चंद्रकांत पाटील ५) नरेंद्र भोंडेकर ६) मंजुळा गावित