ऑनलाइन लोकमतभिवंडी दि.१७: शहरातील चाचा नेहरू हिन्दी हायस्कुलमध्ये इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांसाठी सहामाही परिक्षेत शारिरीक शिक्षण विषयाच्या पेपरात विराट कोहलीच्या गर्लफ्रेन्ड विषयी विचारलेल्या प्रश्नाने शहरातील पालकांनी संताप व्यक्त केला असुन या प्रकरणी शाळेचे मुख्याद्यापक ए.आर पांडे यांनी ‘त्या’शिक्षकावर कारवाई केली आहे.
शहरांतील शिवाजी चौकाजवळ सहयोगी शिक्षण संघ व्दारा संचलीत चाचा नेहरू हिन्दी हायस्कुल असुन या शाळेतील माध्यमिक विद्यार्थ्यांच्या परिक्षा सध्या सुरू आहेत.शाळेत शरिरीक शिक्षण(पी.टी.)सह एकुण १३ शिक्षक कमी आहेत.त्यामुळे इयत्ता ९वी चे हिन्दी विषयाचे शिक्षक मनोज राय यांना सहामाही परिक्षेसाठी शारिरीक शिक्षणाचा पेपर बनविण्याची जबाबदारी सोपविली होती.त्यांनी पेपरात विराट कोहलीच्या गर्लफ्रेन्ड विषयी प्रश्न विचारला होता.त्याचे उत्तर मुलांकडून सोडवून घेण्यात आले
त्यानंतर पालकांकडून या प्रश्नाची दखल घेत काल पासून शहरात चर्चेचा विषय बनला.त्याचबरोबर पालकांनी संताप व्यक्त करीत मुख्याद्यापकांकडे तक्रारी केल्या.या घटनेने शाळेची बदनामी झाली. शाळेचे मुख्याद्यापक ए.आर.पांडे यांनी शारिरीक शिक्षण विषयाचे पेपर काढणारे मनोज राय यांना नोेटीस बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागीतले.या बाबत विराट कोहली हा भारतीय संघातील उत्तम खेळाडू असल्याने विद्यार्थ्यांना त्यांची माहिती असावी,असा उध्देश होता.मात्र विचारलेला प्रश्न नकळत विचारला असुन या बद्दल मनोज राय याने माफीनामा दिला आहे.हा माफीनामा शाळेच्या संचालकासमोर ठेवणार असल्याची माहिती मुख्याद्यापक ए.आर.पांडे यांनी ‘लोकमत’ला दिली.