लातूर : महाराष्ट्र बँकेच्या यूपीआय अॅपमधून झालेला ८५ लाखांचा गैरव्यवहार उघडकीस आणणाऱ्यांच्याच पाठीमागे बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे या आठ ग्राहकांची धावाधाव सुरू आहे.उदगीर येथील बाळासाहेब राजकुमार बिराजदार या प्लॉटिंग व्यावसायिकाकडे युसुफ जावेद शेख याने १ एकर ५ गुंठ्यांचा १ कोटी ५ लाखांचा सौदा केला. हे पैसे आपल्याला बँकेद्वारे दिले जातील, असे सांगितले. त्यामुळे बिराजदार यांनी महाराष्ट्र बँकेचे युपीआय अॅप इन्स्टॉल केले. सुरुवातीस स्वत:चे तसेच अन्य दोघांचे खाते क्रमांक दिले. या तिन्ही खात्यांवर प्रत्येकी ५-५ लाख रुपये जमा झाले. त्यानंतर बिराजदार यांनी आणखी पाच जणांचे खाते क्रमांक दिले असता या खात्यांवर ८५ लाख रुपये जमा झाले.शंका आल्याने बिराजदार यांनी लातूरचे झोनल मॅनेजर महेश बन्सवाणी यांना अॅपच्या माध्यमातून खात्यात पैसे नसतानाही समोरील खात्यात पैसे जात असल्याचे पुराव्यानिशी दाखविले. मात्र, त्यानंतर बँकेने या पैशांसाठी या आठही खातेदारांकडे तगादा लावण्याबरोबर नोटिसाही बजावल्या. मी दिलेल्या आठ खात्यांवर ८५ लाख रुपये जमा झाले असले, तरी त्यापोटी मी रोख ३० लाख रुपये बँकेकडे भरणा केला आहे. तसेच १५ लाख रुपये बँकेने खात्यावरून वळते करून घेतले आहेत. उर्वरित ४० लाख रुपये भरण्यासाठी बँकेकडे दोन महिन्यांचा कालावधी मागितला असता तो दिला जात नसल्याचे बाळासाहेब बिराजदार यांनी सांगितले. वास्तविक पाहता हा घोटाळा मीच अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगितले. या प्रकरणी त्यांनी उदगीर न्यायालयात बँकेविरोधात धाव घेतली आहे़अधिकाऱ्यांनी टाळले भाष्य...या संदर्भात महाराष्ट्र बँकेचे लातूरचे झोनल मॅनेजर महेश बन्सवाणी यांच्याशी संपर्क साधला असता हे प्रकरण न्यायालयात दाखल झाले आहे. त्यामुळे काहीही बोलणे योग्य नसल्याचे सांगून त्यावर भाष्य टाळले.
‘अॅप’मधील गैरव्यवहार उघड करणाऱ्यांवरच कारवाई
By admin | Published: April 15, 2017 1:40 AM