मुंबई : राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांनी उपचारासाठी चेक स्वीकारावेत, असे निर्देश देतानाच जी खासगी रुग्णालये पैशासाठी रुग्णांची अडवणूक करतील, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिला. नोटा नसल्याने काही रुग्णांचे नातेवाईक बिलापोटी चेक देत आहेत, मात्र काही खासगी रुग्णालयांनी ते नाकारत रोख रकमेचा आग्रह धरत अडवणूक करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्व खासगी रुग्णालयांना तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे रुग्णांची अडचण होऊ नये यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. धरसोड निर्णयाचा फटकाआरोग्य सेवा संचालनालयाने ९ नोव्हेंबर रोजी एक पत्रक काढून शासकीयसोबतच खासगी इस्पितळांनी ११ नोव्हेंबरपर्यंत ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याच्या सूचना सर्व खासगी इस्पितळांना दिल्या होत्या. त्यानंतर ही मुदत १४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली. तसे सुधारित पत्रक ११ नोव्हेंबर रोजी काढले. मात्र, त्याच दिवशी रात्री उशिरा आरोग्य सेवा संचालनालयाने दुसरे पत्रक काढून ५०० व १००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास स्थगिती दिल्याचे कळविले. सरकारच्या या धरसोड निर्णयामुळे रुग्णालयांची पंचाईत, तर रुग्णांची हेळसांड झाली. (प्रतिनिधी)
धनादेश न स्वीकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 5:50 AM