मुंबई : मुंबई विद्यापीठातील गोंधळाची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी गंभीर दखल घेतली आहे. कुलगुरु संजय देशमुख यांच्यावरील कारवाईचे अधिकार राज्यपालांच्या अधिकार क्षेत्रात आहेत. लांबलेल्या निकालाबाबत राज्यपाल नक्की चौकशी करतील आणि कुलगुरु दोषी असतील तर निश्चित कारवाई करतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधान परिषदेत केले.मुंबई विद्यापीठाचे लांबलेले निकालाचा मुद्दा राष्ट्रवादीचे सदस्य सुनील तटकरे यांनी उपस्थित केला होता. पाच तारखेपर्यंत सर्व निकाल जाहीर होतील अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली होती. मात्र पाच तारीख जवळ आली तरी किती निकाल लागले याबाबत अजूनही सांशकता असल्याचे सांगत कुलगुरु संजय देशमुख यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तटकरे यांनी केली. यावर, आतापर्यंत २३१ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.शिवसेना-राष्ट्रवादीत शाब्दिक चकमकअनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाली. या प्रकरणात शिवसेना दुटप्पी भूमिका घेत असल्याचा तटकरे यांचा आरोप परब यांनी फेटाळून लावत, याच प्रश्नावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याविरोधात हक्कभंग मांडताना राष्ट्रवादी काँग्रेसने दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप केला. हक्कभंग मांडताना कोणाचे अदृश्य हात समोर आले ते दिसून आल्याचा टोला परब यांनी लगावला.१८ निकाल गुरुवारी घोषित!गुरुवारी सायंकाळपर्यंत १८ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर केले. त्यामुळे आतापर्यंत एकूण २४०अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले असून, अजून २३७ अभ्यासक्रमांचे निकाल शिल्लक आहेत. गुरुवारी १ हजार ४७७ प्राध्यापकांनी उत्तरपत्रिका तपासण्याचे काम केले असून एका दिवसात एकूण १३ हजार ३६२ उत्तरपत्रिकांचे मूल्याकंन पूर्ण झाले.
...तर कुलगुरूंवर कारवाई होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2017 3:55 AM