पुणे : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फुटल्याप्रकरणी, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष महावीर माने यांच्यावर कारवाईचे संकेत रविवारी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांत माने यांची उचलबांगडी होण्याची शक्यता आहे.परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने, लाखो विद्यार्थांचे भवितव्य टांगणीला लागले. शालेय शिक्षणमंत्री तावडे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे या प्रकरणाचा अहवाल ४८ तासांत शासनास सादर करण्यात आला. तथापि, आठ दिवसांचा कालावधी उलटूनही शासनाकडून दोषींवर कोणत्या प्रकारची कारवाई न झाल्याने शिक्षण क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू झाली. या पार्श्वभूमीवर पुण्यात एका खासगी कार्यक्रमात पत्रकारांनी तावडे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘अहवालात ज्या व्यक्तींवर ठपका ठेवला त्यांच्यावर कारवाई केली जाईल.’ (प्रतिनिधी)
परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांवर होणार कारवाई
By admin | Published: January 25, 2016 2:51 AM