सुनील काकडे / ऑनलाइन लोकमत -
वाशिम, दि. 13 - ‘ग्रामपंचायतीचे संगणक पोहोचले चहाच्या टपरीत’, अशा आशयाचे वृत्त १२ ऑगस्ट रोजी ‘लोकमत ऑनलाईन’ला प्रकाशित होताच खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने फाळेगांव ग्रामपंचायतीची चौकशी सुरू केली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्याचे सुतोवाच वाशिमचे गटविकास अधिकारी डी.एस.बसुटे यांनी दिले आहेत.
तालुक्यातील फाळेगांव (थेट) ग्रामपंचायतीचे नवेकोरे संगणक गुरूवार, ११ ऑगस्ट रोजी चक्क वाशिम शहरातील एका चहाच्या टपरीत आढळून आले. यासंदर्भात ‘लोकमत’ने १२ ऑगस्टला ‘ऑनलाईन’ वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचा गचाळपणा चव्हाट्यावर आणला. सोबतच तज्ज्ञ तथा प्रशिक्षित कर्मचा-यांअभावी शासनाकडून मिळालेले संगणक व प्रिंटर गेल्या अनेक महिन्यांपासून धूळखात पडून असल्याचा मुद्दाही यावेळी उजागर करण्यात आला.
संगणकाचा वापरच होत नसल्याने ग्रामपंचायतीच्या माध्यमातून दिल्या जाणारे विविध प्रकारचे दाखले, १३ वा, १४ व्या वित्त आयोगाची कामे, यासह इतर विकासकामांची अद्ययावत नोंद ठेवणे जिकीरीचे ठरत असून काही वर्षांपूर्वी ‘संग्राम’च्या माध्यमातून ‘ऑनलाइन' झालेल्या बहुतांश ग्रामपंचायती सद्या ‘ऑफलाईन’ झाल्या. अशा बिकट स्थितीत खासगी संगणक चालकांकडून ग्रामपंचायतींना कामे करून घ्यावी लागत असून ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमधील संगणक चक्क बाहेर पडत आहेत. फाळेगांव ग्रामपंचायतीबाबत घडलेल्या प्रकारावरून ही बाब स्पष्टपणे अधोरेखीत होत असल्याचा मुद्दा ‘लोकमत’ने उजागर केला.
दरम्यान, या गंभीर प्रकरणाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम.अहमद यांनी तत्काळ दखल घेवून वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डी.एस.बसुटे यांना चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार, चौकशीस प्रारंभ झाला असून दोषींची गय केली जाणार नाही, अशी ग्वाही बसुटे यांनी दिली.