लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे/भिवंडी : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी) कडून सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांमध्ये काही ठेकेदारांनी अनेक कामे घेतली असल्याने ती ठप्प आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी हजेरी घेतली. शहापूर तालुक्यातील बाहुली धरण प्रकल्पाला गती देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आदेश पाटील यांनी दिले.
ठाण्यातील शासकीय विश्रामगृहावर पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन झाडाझडती घेतली. भिवंडीतील काेनगाव व पडघा येथील पाणीपुरवठ्याच्या कामांची पाहणी केली. शहापूर तालुक्यातील वासिंद, आसनगाव, सरपाेली, खर्डी या ठिकाणच्या कामांना त्यांनी भेटी दिल्या. बाहुली धरण याेजनेची पाटील यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना कामे गतीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
रखडलेल्या कामांसाठी पाठपुरावा
- देशाचा ‘हर घर जल... हर घर नल’ हा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. तो पूर्णत्वास नेण्यासाठी हा दौरा असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. धरणांची रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे पाठपुरावा करीत असल्याचेही पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.
- भिवंडी तालुक्यात पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण शंभर टक्के पूर्ण होणार नाहीत. पण, ज्या कामांची गती संथ आहे, त्यांना गती देण्याचे काम सुरू आहे, असे पाटील यांनी सांगितले.
जलजीवन मिशनची एक हजार ४७ कामे
- ठाणे जिल्ह्यात जलजीवन मिशनमध्ये एक हजार ४७ कामे सुरू आहेत. त्यापैकी ७२० नळपाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण असून, ३२७ कामे घरगुती नळजोडणीची आहेत. यामध्ये शहापूर तालुक्यातील सात कामे सुरू झालेली नाहीत.
- वनविभागाच्या परवानगीअभावी चार कामे प्रलंबित आहेत. दाेन कामे जागेच्या वादामुळे प्रलंबित आहेत. एका ठिकाणी रस्ता नसल्याने काम प्रलंबित आहे. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू केलेली परंतु सध्या बंद असलेली ५१ कामे आहेत.
अधिकाऱ्यांची झाडाझडती
- 'बनावट रिपोर्ट सादर करणारा अभियंता निलंबित ' या मथळ्याखाली लोकमत ४ जानेवारी रोजी वृतप्रसिद्ध केलेले आहे.
- या वृत्ताची दखल घेत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ठाणे जिल्हा दौरा करून जिल्हा परिषद पाणी पुरवठ्याच्या कामांची पाहाणी करून अधिकाऱ्यांसह ठेकेदारांची झाडाझडती केली. कामे जलदगतीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.