पुणे : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत काही नगरसेवकांची मुंबईत झाली ती केवळ सदिच्छा भेट होती. जे कार्यकर्ते पक्षांतर करून आले तेही गुन्हेगार नाहीत. त्यांच्यावर फक्त आरोप आहेत. न्यायालयात त्यांना शिक्षा झाली, तर भाजपा त्यांना पक्षातून काढून टाकेल, असे खासदार संजय काकडे यांनी सांगितले. पक्षप्रवेश पालकमंत्री गिरीश बापट तसेच स्थानिक आमदारांना विश्वासात घेऊनच होत आहेत, असे ते म्हणाले.राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस तसेच मनसेच्या काही नगरसेवकांचे भाजपात पक्षांतर घडवून आणल्यामुळे गेल्या काही दिवसांत खासदार काकडे चर्चेत आले आहेत. संबंधितांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करून भाजपातीलच एका गटाने काकडे यांच्या विरोधात आघाडी उघडली. त्याचा प्रतिवाद काकडे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना त्या-त्या कार्यकर्त्यांची नावे घेऊन केला.भाजपा नैतिकता पाळणारा पक्ष आहे. यांच्यापैकी एकाला जरी न्यायालयात शिक्षा झाली, तर त्यांना लगेचच पक्षातून काढून टाकले जाईल. सर्व पक्षप्रवेश हे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीतच होतील, असे काकडे यांनी सांगितले़ काकडे म्हणाले, ‘‘पिंटू धाडवे व अन्य नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली ती सदिच्छा भेट होती. यातील पिंटू धाडवे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक आहेत. त्यांच्यावर ३ गुन्हे होते, त्यातून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे. गेल्या ९ वर्षांत त्यांच्यावर कसलीही केस नाही. पप्पू घोलप यांच्यावर ४ गुन्हे होते. ३ मधून ेत्यांची निर्दोष सुटका झाली. १ केस आहे ती साध्या मारामारीची आहे. श्याम शिंदे यांच्यावरही मोक्का किंवा तडीपारी अशी कसलीही कारवाई नाही. मारामारीचे गुन्हे आहेत; मात्र ते अट्टल गुन्हेगार असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे ते योग्य नाही. मुख्यमंत्र्यांना याची पूर्ण कल्पना दिली आहे.’’बाबा बोडके मुख्यमंत्र्यांसमवेतच्या छायाचित्रात कसा, याचा खुलासा संबंधित बांधकाम व्यावसायिकांनी केला आहे. त्याच्याशी आपला संबंध नाही, असे काकडे यांनी सांगितले. अजित पवार यांनी त्यासंबंधाने केलेल्या टीकेविषयी बोलताना काही वर्षांपूर्वी हेच पवार त्यांना मांडीवर घ्यायचेच बाकी होते, असे उत्तर काकडे यांनी दिले.आणखी २० ते २५ नगरसेवक आपल्या माध्यमातून भाजपात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, असा दावा काकडे यांनी केला. पक्षाचे ज्या भागात वर्चस्व नाही तेथून नगरसेवक निवडून यावेत, यासाठी प्रयत्न करीत आहे. पुण्याचे नेतृत्व नि:संशय बापट यांच्याकडेच आहे. ३० पेक्षा जास्त वर्षे ते पक्षात आहेत; त्यामुळे तेच नेते आहेत, असे काकडे म्हणाले. (प्रतिनिधी)>भाजपाची वेगळी संस्कृतीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ५० लाखांत आमदार फुटायचे, आता नगरसेवकपण फुटत नाहीत, असे वक्तव्य केले होते.तुमच्याकडे नगरसेवक कसे येतात, असे विचारले असता ‘ज्यांची जशी संस्कृती तसे ते बोलतात, असे काकडे म्हणाले. भाजपाची एक वेगळी संस्कृती आहे व ती सर्वांना माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.>शिवसेनेशी युती नकोचशिवसेनेबरोबर युती नकोच, असे आपले व्यक्तिगत मत आहे. सध्याच ९० ते १०० नगरसेवक निवडून येतील, अशी भाजपाची स्थिती आहे. माझ्या माहितीप्रमाणे बहुसंख्य आमदारांचे मतही युती नको असेच आहे; मात्र त्यासंबंधीचा निर्णय पक्षात वरिष्ठ पातळीवर होईल, असे खासदार काकडे म्हणाले.
भाजपात प्रवेश केलेले कार्यकर्ते गुन्हेगार नाहीत
By admin | Published: October 20, 2016 1:08 AM