सांगली : दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिनानी शेतकरी संघटनेने मंगळवारी ‘दूध बंद’ आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला सुरुवात झाली असून आज सकाळी स्वाभिनानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बंगळुरु महामार्गावरील येल्लूर फाट्याजवळ गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला. हा टँकर 25 हजार लिटर दूध घेऊन मुंबईला जात होता. तर, दुसरीकडे सांगलीपाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातही टँकर फोडाफोडी सुरु केली आहे. येथील बिद्री या ठिकाणी गोकुळचा टँकर फोडला. तर नांदणी येथे भैरवनाथाला दुधाचा अभिषेक घालून स्वाभिनानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
दरम्यान, स्वाभिनानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला गोकुळ दूध संघाने मंगळवारी सकाळच्या सत्रातील संकलन बंद ठेवून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, संभाजी ब्रिगेडने याविरोधात विभागीय उपनिबंधक (दुग्ध) यांच्याकडे तक्रार केली होती. त्यानंतर दुग्ध विभागाने गोकुळला नोटीस पाठवली होती. या नोटीसनंतर गोकुळ दूध संघाने स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला दिलेला पाठिंबा मागे घेत, सकाळचे दूध संकलन आणि दूध वाहतूक सुरु ठेवली होती. त्यामुळे स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत सकाळी गोकुळ दूध संघाचा टँकर फोडला.
आज मंत्रालयात बैठक घसरलेल्या दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी मंगळवारी दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे. चार महिन्यांपासून ‘कोरोना’मुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटल्यामुळे दूध संघाने दूध खरेदी दर कमी केले आहेत. दुधाला वाजवी दर मिळत नसल्यामुळे शेतकरी नेते आणि दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत. या विविध समस्यांच्या अनुषंगाने शेतकरी आणि दूध संघाचे प्रश्न समजावून घेवून त्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.