मुंबई, दि. 28 - बॉलिवूडमधील अभिनेता इंदर कुमारचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शुक्रवारी ( 28 जुलै ) अंधेरीतील राहत्या घरी इंदरचं निधन झाले. इंदरचे वय अवघे 45 वर्षे होते. इंदरनं बॉलिवूडमधील कित्येक मोठ्या सिनेमांमध्ये काम केले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इंदरला गुरुवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. यावेळी तो अंधेरीतील चार बंगला परिसरातील आपल्या निवासस्थानी होता. शुक्रवारी संध्याकाळी यारी रोड वरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दरम्यान, इंदरनं सलमान खानसोबत 'कहीं प्यार ना हो जाए ', 'तुमको ना भूल पाएंगे ' आणि 'वॉटेंड ' सिनेमांमध्ये काम केले आहे. तर एकता कपूरची टीव्ही सीरियल 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मध्ये त्यानं मिहीर वीरानीची भूमिका निभावली होती. तर अक्षय कुमारसोबत ‘खिलाड़ियों का खिलाड़ी’सिनेमांमध्ये स्क्रीन शेअर केली आहे.
2014मध्ये इंदरवर एका मॉडलनं बॉलिवूडमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, सध्या तो 'फटी पडी है यार' नावाच्या सिनेमात तो काम करत होता.