Maharashtra Politics: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारींसह भाजप नेत्यांनी केलेली वादग्रस्त विधाने, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, नागपूरमधील कथित भूखंड घोटाळा आणि या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची केलेली मागणी यांसह अनेक मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळत आहे. यातच देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलेल्या एका विधानामुळे आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अभिनेत्री केतकी चितळेनेही यावर भाष्य केले आहे.
अमृता फडणवीस नागपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान, अभिरूप न्यायालयात सहभागी झाल्या होत्या. तिथे नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तुम्ही त्यांचा उल्लेख राष्ट्रपिता असा केला. माझा आरोप असा आहे की, जर नरेंद्र मोदी हे राष्ट्रपिता असतील तर महात्मा गांधी कोण आहेत? असा प्रश्न मुलाखतकारांनी विचारला. त्याला उत्तर देताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, महात्मा गांधी हे आपल्या देशाचे राष्ट्रपिता आहेत. तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. असे माझे ठाम मत आहे. आपले दोन राष्ट्रपिता आहेत, नरेंद्र मोदी हे आताच्या नवीन भारताचे तर महात्मा गांधी हे तेव्हाच्या काळातील राष्ट्रपिता आहेत, असे विधान अमृता फडणवीस यांनी केले. यानंतर नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर केतळी चितळेने प्रतिक्रिया दिली आहे.
जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद जुना, आता...
केतकी चितळेने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. जुने विरुद्ध नवे गुरु आणि जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होत चालला आहे. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय आणि आता आपण स्वत:लाही बदलायची वेळी आली आहे. त्यामुळे आता ३ हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या १०० वर्षे झाली आहेत, हे सत्यही आपण स्वीकारायला हवे, असा टोला तिने अमृता फडणवीसांना लगावला आहे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय जागो मेरे देश, असेही केतकीने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, केतकी चितळेची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तसेच तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचेही पाहायला मिळत आहे. काही महिन्यांपूर्वी केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावे लागले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"