पिंपरी चिंचवड: डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ होता. तो माझ्या मामांचा मुलगा होता, असा खुलासा ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केला. पिंपरी चिंचवड कलारंग सांस्कृतिक कला संस्थेच्या 21 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात नाना पाटेकर ह्यांची प्रकट मुलाखत आज घेण्यात आली. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत सर्व प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. नाना पाटेकर यांनी मुलाखतीत राजकारण, समाजकारण, चित्रपट, गुन्हेगारी, शेतकऱ्यांच्या समस्या अशा विविध विषयांवर भाष्य केलं. त्यावेळी डॉन मन्या सुर्वे हा माझा भाऊ होता. तो माझ्या मामांचा मुलगा होता, असं नाना पाटेकर म्हणाले. गुन्हेगारीशी संबंधित भूमिकांवर बोलताना नानांनी मन्या सुर्वेचा संदर्भ दिला. कधीकाळी मुंबईत मन्या सुर्वेची दहशत होती. त्याच्या आयुष्यावर बेतलेला शूटआऊट अॅट वडाला चित्रपट २०१३ मध्ये प्रदर्शित झाला होता. यावेळी नाना पाटेकर यांनी पिंपरी चिंचवडमधल्या त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. 'पिंपरी चिंचवडमध्ये मी एका बांधकामावर मुकादम म्हणून काम केलं आहे. त्यावेळी मी कामगारांचे पगार द्यायचो. त्यामुळे या शहराशी माझे जुने ऋणानुबंध आहेत,' असं नानांनी सांगितलं. त्यांनी येरवड्यातल्या कैद्यांची आठवणदेखील उपस्थितांना सांगितली. येरवड्यात गेल्यानंतर मी 450 खुन्यांना भेटलो. त्यांच्याशी बोललो. प्रत्येकानं क्षणिक रागातून खुनासारखं कृत्य केलं होतं. त्या रागामुळे त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा काळ ते तुरुंगात घालवत होते, असं नाना म्हणाले. प्रत्येकानं रागाचा तो क्षण सांभाळायला हवा, असा सल्ला नानांनी उपस्थितांना दिला.कलाकारांचं आयुष्य आणि त्यातल्या अडचणी, समस्या यावरदेखील नाना पाटेकर मुलाखतीत मोकळेपणानं बोलले. एका भूमिकेत दुसऱ्या भूमिकेत जाताना आम्ही कलाकार म्हणून तुमच्या समोर येत असतो. मात्र हे करताना घरच्यांना पुरेसा वेळ देता येत नाही. हे सगळं सुरू असताना मुलं मोठी होत असतात आणि ज्यावेळी आम्ही घरत परततो, तेव्हा आमचा नटसम्राट झालेला असतो, असं म्हणत नाना पाटेकरांनी कलाकारांची व्यथा सर्वसामान्यांसमोर मांडली.
मुंबईचा डॉन मन्या सुर्वे माझा भाऊ होता; नाना पाटेकरांनी सांगितलं 'नातं'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2020 10:47 PM