ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २५ - मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी येरवडा तुरूगांत शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची अखेर आज येरवडा तुरूंगातून सुटका झाली आहे. सकाळी ८.३० च्या सुमारास तो येरवडा तुरूंगातून बाहेर पडला असून थोड्याच वेळात चार्टर्ड विमानाने मुंबईत दाखल होणार आहे. त्याची पत्नी मान्यता हिच्यासह चित्रपट निर्माते- दिग्दर्शक राजू हिरानी हेही तुरूंगाबाहेर उपस्थित होते.
संजयच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर तुरूंगाच्या बाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, त्याच्या सुटकेच्या निषेधार्थ घोषणा देणा-या काही लोकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले. मुंबईत आल्यानंतर संजय सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून तुरूंगात असलेल्या संजयची आठ महिने आधीच तुरूंगातून सुटका होणार असून या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. संजय दत्तने असे कोणते काम केले, की त्यावरून त्याची शिक्षा माफ करण्याचा निर्णय सरकार व तुरुंग प्रशासनाने घेतला, असा प्रश्न उपस्थित करत संजयाला शिक्षेत देण्यात आलेली आठ महिन्यांची सूट रद्द करण्यात यावी. तसेच संपूर्ण शिक्षा भोगण्यासाठी त्याची पुन्हा तुरुंगात रवानगी करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रदीप भालेकर यांनी जनहित याचिकेद्वारे केली.
दरम्यान, संजय दत्तच्या स्वागतासाठी वांद्र्यामध्ये त्याच्या चाहत्यांनी पोस्टर्स लावली आहेत.
सुटकेचा मार्ग सोपा नव्हता
तब्बल ३ वर्षानंतर सुटका झाल्यानंतर तुरूंगातून बाहेर पडलेला संजय दत्त खूप हळवा झाला होता. त्याची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यमप्रतिनिधींची झुंबड उडालेली असताना ' सुटकेचा मार्ग सोपा नसतो मित्रांनो..' एवढीच प्रतिक्रिया संजयने दिली. तसेच चाहत्यांनी दिलेल्या पाठिब्यांसाठी त्याने सर्वांचे आभारही मानले.
घटनाक्रम..
१९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी ६ मे २0१३ रोजी संजय दत्तची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाने त्याला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली. त्यापैकी त्याने खटल्यादरम्यान दीड वर्षांची शिक्षा आधीच भोगली होती. त्यामुळे त्याला मे २0१३ पासून साडेतीन वर्षांची शिक्षा पूर्ण करायची होती. ही शिक्षा ऑक्टोबरमध्ये पूर्ण होणार होती. मात्र त्याआधीच संजय दत्तची कारागृहातून सुटका होणार आहे.
सुटकेचे गणित...
कैद्याच्या वर्तवणुकीनुसार महिन्याला सात दिवस शिक्षा कमी होऊ शकते. अशी वर्षाला ८४ दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. कैद्याचे वर्तन उत्तम असेल तर अतिरिक्त ३0 दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. या हिशेबानुसार संजय दत्तची वर्षातील ११४ दिवसांची शिक्षा कमी होऊ शकते. जेल अधीक्षकांना कोणत्याही कैद्याची ३0 दिवसांची, पोलीस उपमहानिरीक्षकांना ६0 दिवसांची, तर पोलीस महासंचालकांना ९0 दिवसांची सुटी माफ करण्याचे अधिकार आहेत. संजयला बेकायदेशीरपणे शिक्षेत माफी देण्यात आली आहे.त्याने असे कोणते चांगले वर्तन केले आहे की त्याला आठ महिन्यांची शिक्षा माफ करण्यात आली?असा प्रश्न विचारला आहे.