मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिने मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. यातच कंगना राणौतने पुन्हा एक ट्विट केल्यामुळे राजकीय वातावरण पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. एका महान पित्याचा पुत्र होणं, हे एकमेव कर्तृत्व होऊ शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? असा सवाल करत कंगना राणौतने ट्विटरच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
"एका महान पित्याचा पुत्र होणं, हे एकमेव कर्तृत्व होऊ शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण? तुम्ही माझ्यापेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम करता हे तुम्ही कसे ठरवले? आता मला तिथे येण्याचा अधिकारही नाही?", असे सवाल कंगना राणौतने उपस्थित केले आहे. तसेच, या ट्विटला #ShameOnMahaGovt असा हॅशटॅग तिने वापरला आहे.
दरम्यान, मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सर्वच स्तरावरुन कंगना रानौतवर टीकेची झोड उठत आहे. शिवसेना, काँग्रेस, मनसे या पक्षांनी कंगना रानौतला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, असे असले तरीही कंगना रानौत यावर थांबली नाही. तिने यापुढेही ट्विट करणे सुरुच ठेवले आहे . "महाराष्ट्र कुणाच्या बापाचा नाही. मराठीच्या गौरवाला ज्यांनी प्रतिष्ठित केले, महाराष्ट्र त्यांचाच आहे. मी मराठा आहे आणि हे मी निक्षूणपणे सांगते. जे करायचंय ते करा", असा इशारा तिने ट्विटरवर दिला आहे.
याचबरोबर, "यांची लायकी नाही. गेल्या 100 वर्षात मराठ्यांचा इतिहास सांगणारा एकही चित्रपट तयार केला नाही. मी इस्लाम डॉमिनेटेड इंडस्ट्रीमध्ये माझा जीव आणि करिअर पणाला लावलं. छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या ठेकेदारांना विचारा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलं?", असा सवाल कंगना रानौतने उपस्थित केला आहे.
"हिंदी चित्रपटसृष्टीत मी सर्वातआधी छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट तयार केला आहे, हे चापुलसी करणारे, महाराष्ट्राप्रती प्रेम असणाऱ्यांनी लक्षात ठेवावं. मी चित्रपट तयार केला त्यावेळीदेखील या लोकांनी मला विरोध केला होता", असेही कंगना रानौतने म्हटले आहे.
कंगनाचे थोबाड फोडण्याचा इशाराकंगना राणौतला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगना राणौतवर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे, असे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगना राणौतवर निशाणा साधला आहे.
पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर पुन्हा हल्लाबोल मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला. याशिवाय, धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही. आम्ही अॅक्शन घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचं रक्षण करते आणि त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.
मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा; कंगनाचे खुले आव्हान"मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर आडवा", असे आव्हान कंगनाने दिले आहे.
कंगनाला मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाहीराज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतवर जोरदार टीका केली आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आपले महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दल सक्षम आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अभिनेत्रीचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांना मुंबईत राहाणे सुरक्षित वाटत नाही, त्यांना मुंबई किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही, असे मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
आणखी बातम्या...
- एकतर ती संस्कारानेच कृतघ्न किंवा मानसिक संतुलन ढासळलेले; धनंजय मुंडेंची कंगनाला चपराक
-'...अन्यथा कंगनाच्या सिनेमाचे सेट जाळून टाकू', करणी सेनेचा इशारा
- कंगनाने मुंबईला शहाणपण शिकवण्याची गरज नाही; भाजपाचा 'यू-टर्न'
- मुंबईत येतेय, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा; कंगनाचे खुले आव्हान
- पोकळ धमक्या देत नाही, अॅक्शन घेतो; संजय राऊतांचा कंगना राणौतवर हल्लाबोल