मुंबई - मुंबईतील आलिशान क्रूझवर सुरू असलेल्या ड्रग्स पार्टीवर कारवाई करून शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यापासून एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे दररोज समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत. त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवरच वानखेडे कुटुंबाने यावर्षी दिवाळी साजरी केली. दरम्यान, दिवाळी पाडव्यादिवशी वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने पती समीर वानखेडेंसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
क्रांती रेडकर हिने दिवाळी पाडव्यानिमित्त एक फोटो शेअर करत फेसबुवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात ती म्हणते की, पाडवा संपन्न, माझा प्रिय पती, माझ्या ऊर्जा आणि सकारात्मकतेचा स्रोत, तुझ्याकडून मी खूप काही शिकले. ध्येयाप्रतीचा तुझा दृढनिश्चय आणि प्रामाणिकपणा मला आश्चर्यचकित करतो. देशाप्रती तुझा प्रामाणिकता वाखाणण्याजोगा आहे, तुला देशासाठी किती योगदान द्यायचे आहे, हे फक्त मलाच माहिती आहे. तसेच आमच्यासाठी तु्झ्या मनात किती चांगल्या योजना आहेत, हेसुद्धा मलाच माहिती आहे, असेही क्रांती तिच्या पोस्टमध्ये म्हणाली.
आर्यन खान ड्रग्स केसमधून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्याचे वृत्त काल आले होते. मात्र नंतर समीर वानखेडे यांनी हे वृत्त फेटाळले होते. दरम्यान, आज एनसीबीने या संदर्भातील पत्रक प्रसारित करत समीर वानखेडे यांना हटवण्यात आले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.