पुणे : इयत्ता अकरावी प्रवेशाची शून्य फेरी उद्या (दि. 12) पासून सुरू होत आहे. या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, इन हाउस आणि अल्पसंख्यांक संस्थेतील कोट्यातंर्गत प्रवेश घेता येतील. तसेच प्रवेश अर्जाचा भाग एक व दोनही भरता येणार असून पहिल्या नियमित फेरीसाठी पसंती क्रम भरता येतील. पहिली नियमित फेरी 23 ऑगस्ट पासून सुरू होईल. शिक्षण विभागाकडून पुण्यासह पिंपरी चिंचवड, मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महापालिका क्षेत्रासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.
सध्या प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता 12 ऑगस्टपासून अर्जाचा भाग दोन भरता येणार आहे. या भागामध्ये महाविद्यालयनिहाय पसंती क्रम भरावे लागणार आहेत. प्रवेशाची शुन्य फेरीही उद्यापासून सुरू होईल. यामध्ये विविध कोट्यातील प्रवेश व रिक्त जागा समर्पित करता येतील. दि. 22 ऑगस्ट पर्यंत ही फेरी सुरू राहील. या कालावधीत अर्जाचा भाग एकही भरता येणार आहे. प्रवेशाची पहिली नियमित फेरी 23 ऑगस्टपासून सुरू होईल. या दिवशी पात्र विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना त्यावर 25 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन हरकती घेता येणार आहेत. त्यानंतर 30 ऑगस्टला पहिल्या फेरीसाठी महाविद्यालय निहाय प्रवेश यादी व कट ऑफ प्रसिद्ध केली जाणार आहे. महाविद्यालयात प्रवेशासाठी 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर ही मुदत असेल. या कालावधीत संबंधित महाविद्यालयातील प्रवेश ऑनलाइन पद्धतीने निश्चित करावा लागेल. तसेच पप्रवेश नाकारणे किंवा रद्द ही करता येणार आहे. महाविद्यालयांना 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपर्यंत प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करावी लागेल, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
-------------
नियमित फेरीसाठी सूचना - पहिला पसंती क्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयात प्रवेश बंधनकारक असेल. अन्यथा त्यांना पुढील नियमित फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही. विशेष फेऱ्यांमध्ये त्यांचा विचार केला जाईल. - पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित झाल्यानंतर रद्द केल्यास या विद्यार्थानाही थेट विशेष फेरीत संधी दिली जाईल. या फेरीत प्रवेश निश्चित केल्यानंतर पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही.
--------
प्रवेशाचे वेळापत्रक
12 ते 22 ऑगस्ट - अर्जाचा भाग 1 व 2 भरणे.
शून्य फेरीअंतर्गत कोटा प्रवेश
23 ते 25 ऑगस्ट -
पहिली नियमित फेरी. तात्पुरती गुणवत्ता यादी, त्यावर हरकती.
30 ऑगस्ट - पहिली प्रवेश यादी.
31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर - ऑनलाइन प्रवेश निश्चिती. प्रवेश रद्द करणे, नाकारणे.