नवी मुंबई : पोलीस रेझिंग डेनिमित्त नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी अमलीविरोधी अभियान राबविण्यात आले. या अभियानात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुप्रसिध्द गायक शंकर महादेवन यांनी व्यसनमुक्तीचे धडे दिले. आयुष्य खूप सुंदर असून व्यसनांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते, त्यामुळे व्यसनांपासून दूर राहून आयुष्याचा आस्वाद घ्यावा, असे महादेवन यांनी सांगितले. लव्ह लाइफ, हेट ड्रग्ज या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाला शहरातील विविध शाळा, तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यसनमुक्तीचा संदेश देणारे पथनाट्य याठिकाणी सादर करण्यात आले. या उपक्रमांतर्गत व्यसनांमुळे शरीरावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विविध क्षेत्रातील प्रसिध्द व्यक्तींच्या मुलाखतींद्वारे विद्यार्थ्यांना अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देण्यात आली. यावेळी ड्रग्ज अॅण्ड अॅब्युज इन्फॉर्मेशन सेंटरचे अध्यक्ष युसुफ मर्चंट यांनीही उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. उद्याचे भविष्य जपणे ही वर्तमानकाळाची गरज आहे आणि विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखविण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी दिली. यावेळी व्यसनमुक्तीचा संदेश देत जनजागृती केली. या कार्यक्रमाला नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दिलीप सावंत, सहा. आयुक्त नितीन कौसाडीकर, पोलीस निरीक्षक माया मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
व्यसनांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते : शंकर महादेवन
By admin | Published: November 19, 2016 2:55 AM