ठाणे : ठाण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचे रविवारी पहाटे नेरूळ येथील त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४८ वर्षांचे होते. नेरूळच्या शांतीधाम सारसोळेगाव स्मशानभूमीत दुपारी १ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.प्रवीण शिंदे हे १९९३च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी होते. त्यांनी नाशिक येथून उपजिल्हाधिकारी म्हणून आपल्या प्रशासकीय सेवेला सुरुवात केली होती. त्यानंतर, एमआयडीसी, म्हाडा, रायगड जिल्हाधिकारी कार्यालय येथेही त्यांनी सेवा दिली. अतिशय मनमिळाऊ आणि नेहमी हसतमुख असणारे प्रवीण शिंदे प्रशासनात लोकप्रिय अधिकारी होते. त्यांच्यामागे पत्नी स्वाती, मुलगा शौर्यन, मुलगी सारा, तसेच धाकटा भाऊ अरुण असा परिवार आहे. सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातले शिंदे यांचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात झाले. त्यानंतर, ते राज्यसेवेत रूजू झाले. माजी शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणूनही शिंदे यांनी काम पाहिले होते. कल्याण खाडीतील अनधिकृत, बेकायदेशीर वाळू उत्खनन करणाऱ्या वाळूमाफियांवर बुधवारपासून सुरू केलेल्या धडक कारवाईत ते आघाडीवर होते. सलग चार दिवस केलेल्या या कारवाईत अतिकामाच्या ताणामुळे शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जाते. ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवीण शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल, पोलीस अधीक्षक महेश पाटील, तसेच इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेरूळ येथील निवासस्थानी शिंदे यांचे अंत्यदर्शन घेतले. (प्रतिनिधी)
अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांचे निधन
By admin | Published: April 10, 2017 4:17 AM