'काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 08:12 PM2019-11-16T20:12:55+5:302019-11-16T20:13:19+5:30

'काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही'

Additional help to farmers after the coming of a new Congress-affiliated government - Ashok Chavan | 'काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल'

'काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल'

Next

मुंबई : राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आर्थिक मदत जाहीर केली. यावरून काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी टीका केली आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असून काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना अतिरिक्त मदत जाहीर करेल, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. यामध्ये ते म्हणाले, "अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल." 

याचबरोबर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही राज्यपालांच्या या मदतीवर टीकास्त्र सोडले आहे. राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. याशिवाय, राज्यपालांनी जाहीर केलेली तुटपुंजी मदत म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार असल्याचे सांगत किसान सभेचे सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनीही राज्यपालांवर टीका केली आहे. 

दरम्यान, राज्यात ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यासाठी राज्यपालांनी शेतकऱ्यांना दोन हेक्टरपर्यंतच्या खरिप पिकांसाठी 8 हजारांची मदत जाहीर केली आहे. तर दोन हेक्टरपर्यंतच्या फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी 18 हजार रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे. याबाबत राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत. 

याशिवाय, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शाळा, महाविद्यालयातील परीक्षा शुल्क माफ करण्याचा तसेच आपद्ग्रस्त क्षेत्रात शेतसारा माफ करण्याचा निर्णयही राज्यपालांनी जाहीर केला आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्यात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. त्यामुळे राजकीय पक्षाच्या नेत्यांनी नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेऊन  राज्यपालांकडे मदत जाहीर करण्याची मागणी केली होती. 
 

Web Title: Additional help to farmers after the coming of a new Congress-affiliated government - Ashok Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.