Aditi S Tatkare : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांच्या बैठका, सभा सुरू आहेत. दरम्यान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी सोशल मीडियावर प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली.
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर
आदिती तटकरे यांनी ट्विट करुन आवाहन केले आहे, आपल्या पोस्टमध्ये तटकरेंनी म्हटले आहे की,"माझं फेसबुक अकाऊंट काही अज्ञात व्यक्तींकडून हॅक करण्यात आले असून त्यावरून काही आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केला जात आहे. अशा पोस्टवर कृपया आपण व्यक्त होऊ नये, ही नम्र विनंती, असं आवाहन तटकरे यांनी केलं आहे.
"याबाबत मी पोलिसांत रितसर तक्रार दाखल केली असून लवकरच या हॅकर्सचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तटकरेंचे श्रीवर्धन मतदारसंघात वर्चस्व
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच नेत्यांनी आपआपल्या मतदारसंघात संपर्क दौरा वाढवला आहे. दरम्यान, रायगडमधील श्रीवर्धन मतदारसंघ देखील चर्चेत राहिला. या मतदारसंघामध्ये सध्या आदिती तटकरे या विद्यमान आमदार आहेत. हा मतदारसंघ आधी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, पण खासदार सुनिल तटकरे यांनी या मतदारसंघात आपले वर्चस्व निर्माण करत मतदारसंघावर विजय मिळवला. यावेळी तटकरे यांच्यासाठी हा मतदारसंघ सोपा वाटत असला तरीही मागील पाच वर्षात बदललेल्या राजकीय समिकरणांमुळे निवडणूक आव्हानात्मक असणार आहे.