मुंबई - महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालं आहे. त्यापाठोपाठ पालकमंत्र्यांच्या देखील नियुक्त्या झाल्या आहेत. आधी मंत्रीपदावरून व्यक्त होणार नाराजी आता पालकमंत्रीपदावरूनही वाढत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक नाराज असल्यामुळे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढली आहे.
रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरून जिल्ह्यातील शिवसेनेत नाराजी आहे. महाविकास आघाडीत रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे गेले आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकून सभागृहात दाखल झालेल्या अदिती यांना राज्यमंत्रीपदापाठोपाठ जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. मात्र यामुळे शिवसैनिक नाराज झाले आहेत.
मागील दोन ते तीन दिवसांपासून पालकमंत्रीपदावरून शिवसैनिक आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवत आहे. तर अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शविली आहे. रायगड जिल्ह्यावर शिवसेनेचाच भगवा फडकला पाहिजे अशी शिवसैनिकांची भावना आहे. अन्यथा पदाधिकारी, शिवसैनिक आणि लोकप्रतिनीधी राजीनाम्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
आधीच मंत्रीपदांवरून अनेक नेत्यांमध्ये नाराजी आहे. अब्दुल सत्तार यांची नाराजी दूर करण्यात यश आले असले तरी तानाजी सावंत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यातच आता रायगड जिल्ह्यातील शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे.