मुंबई : महापालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीत उतरण्याची तयारी दर्शविल्याने शिवसैनिकांच्या भुवया उंचावल्या आहेत.एका इंग्रजी वृतपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्वत: आदित्य यांनीच निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत. ‘मी कधीच स्वत:ला निवडणुकांपासून दूर ठेवलेले नाही. जर कधी वेळ पडलीच तर मी तयार आहे,’ असे आदित्य यांनी म्हटले आहे. मुंबई महापालिकेत गेली पंधरा वर्षे आणि राज्यात दोन वेळा शिवसेना सत्तेवर आली, तरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. स्वत: बाळासाहेब ठाकरे निवडणूक लढविण्याच्या विरोधात होते. उद्धव यांनीही निवडणुकीपासून स्वत:ला दूर ठेवले. बाळासाहेब आणि उद्धव या दोघांनी ‘मातोश्री’वरून रिमोट कंट्रोलने किंगमेकरची भूमिका बजावली. जेव्हा आजोबांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामागे त्यांचे काही विचार असतील. मात्र, त्यांनी आपली मते आमच्यावर लादली नाहीत, असे सांगत आमदार म्हणून बरेच काम करण्यासारखे आहे, असे सूचक विधान आदित्य यांनी केल्याने तर्कविर्तक लढविले जात आहेत. (विशेष प्रतिनिधी)
आदित्य लढविणार विधानसभा निवडणूक
By admin | Published: February 16, 2017 12:27 AM