मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेला शिवसेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशा ताकीद शिवसेना नेत्यांकडून देण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी, त्यासाठी नाव कुणाचे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे तर शर्यतीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदित्य यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्या गुरुवारपासून सुरूवात होणार आहे.
शिवसेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलने आणि संवाद यात्रांवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे. या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.
आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा उद्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या अंतर्गत ते जळगावमध्ये संवाद साधणार आहेत. या टप्प्यात, १९ जुलै धुळे, २० जुलै नाशिक शहर, २१ जुलै नाशिक ग्रामीण, नगर आणि २२ जुलै नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी अशी असणार आहे.
या जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरे शिवसेनेचे आणि युवा सेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करणार आहेत. जेणे करून भविष्यातील सक्रिय राजकारणात त्यांना याचा लाभ घेता येईल. त्यासाठी शिवसैनिक देखील सरसावले असून अनेक शिवसैनिकांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होताना पाहायची इच्छा आहे.