मुंबई : अभिनेत्री जिया खान मृत्यू प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर मुंबई सेशन्स कोर्टानं आरोप निश्चित केले आहेत. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवत सूरज पांचोलीवर कलम 306 अन्वय हे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. परंतु सूरजचे वकील प्रशांत पाटील यांनी सूरज पांचोली हा निर्दोष असल्याचं सांगितलं आहे.या प्रकरणात 14 फेब्रुवारीपासून साक्षीदारांच्या जबाबाची तपासणी होणार आहे. 3 जून 2013 रोजी जिया खानने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. जिया खानच्या आत्महत्ये प्रकरणात मुंबई पोलिसांना जियाने लिहिलेले तीन पानी पत्र मिळाले होते. त्यात सूरजशी असलेले संबंध आणि त्याच्याकडून होणा-या शारीरिक व मानसिक छळणुकीसंदर्भात तिने लिहिले होते. ऑक्टोबर 2013मध्ये जियाची आई रबिया खान यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपल्या मुलीने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं होतं.
जिया खान आत्महत्या प्रकरणाचा खटला चालविण्यासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीलाही सीबीआयने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्यासाठी महाधिवक्ते उपस्थित नसल्याने उच्च न्यायालयाने या खटल्याला स्थगितीही दिली होती. त्यानंतर पुन्हा या खटल्यावर सुनावणी झाली आहे. ‘या प्रकरणात दोन तपास यंत्रणा सहभागी आहेत. सीबीआयने दाखल केलेल्या केसमध्ये सरकारला विशेष सरकारी वकील नेमण्याची मुभा आहे का? हा प्रश्न उपस्थित केला,’ असे न्या. ए. के. मेनन यांनी गेल्या सुनावणीत म्हटले होते. विशेष सरकारी वकिलांच्या नियुक्तीनंतर सत्र न्यायालयाने सीबीआयला याबाबत अर्ज करण्याची परवानगी दिली नाही, असे सीबीआयचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले होते.