नागपूर : आदित्य नवखा आहे, पण त्याच्यात 'मी' पणा नाही. कोणीही वरिष्ठ आले तरी आदित्य उठून बसायला खुर्ची देतो. मी मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याचा त्याच्यात अहंकार दिसत नाही, अजित पवार म्हणाले आहेत. पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना अजित पवारांनी आदित्य ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली आहेत. त्याचबरोबर दिवंगत विलासराव देशमुख यांचा पुत्र धीरज देशमुखचंही अजितदादांनी कौतुक केलं आहे. धीरज बोलत असताना मला काल विलासराव देशमुख बोलत आहेत का असंच वाटलं, बोलण्याची स्टाईल हुबेहूब विलासराव यांच्यासारखीच वाटत होती, असं अजित पवार म्हणाले. आमचा रोहित पण चांगला आहे, अदिती तटकरे, विश्वजीत कदम यंग टीम चांगलं काम करत आहेत”, असं म्हणत अजित पवारांनी युवा आमदारांचं कौतुक केलं. शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचं पवारांनी सांगितलं.सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर शेतकरी कर्जमाफीबद्दल चर्चा सुरू आहे. त्यामुळे निश्चितपणे भूमिका घेतली जाईल. शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना दुसरीकडे राज्याच्या विकासासाठी पैसा कमी पडला जाऊ नये, याचेही नियोजन सरकारला करावे लागणार आहे. त्यामुळे काही अवधी लागणार आहे. कर्जमाफीचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना व्हावा, हा हेतूही कर्जमाफी देताना जोपासला जाणार आहे. फेबु्रवारी महिन्यानंतर होणाऱ्या नवीन अधिवेशनात आढावा घेऊन यासंदर्भात घोषणा केली जाऊ शकते, असे संकेत त्यांनी दिले.
आदित्य नवखा आहे, पण त्याच्यात 'मी'पणा नाही; अजितदादांनी थोपटली पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 12:24 PM