मुंबई - महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळ विस्ताराला आज अखेर मुहूर्त मिळाला आहे. यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून युतीच्या काळात मंत्री असणाऱ्या अनेक नेत्यांना डच्चू देखील मिळाला आहे. तर पहिल्यांदा सभागृहात दाखल झालेल्या रोहित पवार, आदित्य ठाकरे, अदिती तटकरे, देवेंद्र भुयार, संदीप क्षीरसागर आणि प्राजक्त तनपुरे यांच्यापैकी अदिती, आदित्य आणि प्राजक्त यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे.
अदिती तटकरे आणि आदित्य ठाकरे या दोन्ही युवा नेत्यांना घराणेशाहीचं पाठबळ असून घराणेशाहीमुळे मंत्रीपद मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. आदिती तटकरे या माजी मंत्री आणि राष्ट्रावादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत. त्या प्रथमच सभागृहात पोहोचल्या असून पहिल्या झटक्यात त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले आहे.
दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे केवळ पहिल्यांदा निवडूनच आले नाही, तर ठाकरे घराण्यातील निवडणूक लढविणारे पहिले व्यक्ती आहेत. त्यांनी देखील कॅबिनेटमंत्रीपदाची शपथ घेतली. आदित्य यांची कॅबिनेटमंत्रीपदी निवड झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्रीपद आणि कॅबिनेट मंत्रीपद एकाच घरात गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दुसरीकडे प्राजक्त तनपुरे यांचीही राज्यमंत्रीपदी वर्णी लागली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. त्याच्या रुपाणे राहुरीला मंत्रीपदाचा मान मिळाला आहे. दरम्यान आदित्य, प्राजक्त आणि आदिती यांना जबरदस्त राजकीय पार्श्वभूमी लाभलेली आहे. किंबहुना त्यामुळेच त्यांना मंत्रीपद मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.