Aaditya Thackeray BJP-Eknath Shinde : शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या नेत्यांवर आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही नेत्यांच्या नियुक्त्या मंत्रिपदाचा दर्जा असलेल्या पदांवर केल्या. त्यावर बोट ठेवत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंवर हल्ला चढवला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोप वाढले आहेत. आदित्य ठाकरे यांनी एका पोस्टमधून शिंदेंसोबत गेलेल्या नेत्यांना लक्ष्य केले आहेत.
आदित्य ठाकरेंची पोस्ट काय?
आमदार आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे की, "खेचून, रडून, ओढून-ताणून मिंधेंनी ३ गद्दारांना महामंडळाचं अध्यक्ष वगैरे केलं... ज्यांना राज्यपाल, मंत्रिपदांचं चॉकलेट दाखवलं होतं, ज्यासाठी सुरतला पळून जायला लावलं होतं. ३३ देशात गद्दार म्हणून प्रसिद्ध केलं. त्यांना आता निवडणुकीच्या तोंडावर, राजवटीचे मोजके दिवस उरले असताना ही मंडळं देऊन गप्प केलं", अशी टीका ठाकरेंनी केली.
गद्दार म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदेंवर टीकास्त्र डागले. "कौतुक आहे ह्यांचं... काय स्वप्नं घेऊन पळाले होते! एका स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर असाच विश्वासघात होतो", असे आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपला काय मिळाले? आदित्य ठाकरेंचा सवाल
"बरं हे होताना अजून कौतुक वाटतं ते भाजपा कार्यकर्त्यांचं... २ वर्षात, आमचं सरकार पाडून, पक्ष फोडून, कुठच्या खऱ्या भाजपा कार्यकर्त्याला काही मिळालं? मिंधेंनी परस्पर पद देऊन टाकली... ह्यांचं काय? महाराष्ट्राला मागे खेचण्यात मिळालेलं यश सोडून भाजपाला काय मिळालं?", असे सवाल ठाकरेंनी भाजपाला केले आहेत.
शिंदेंकडून अडसूळ, शिरसाट, पाटलांचे पुनर्वसन
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळालेल्या आनंदराव अडसूळ यांची अनुसूचित जाती-जमाती महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले. तर हिंगोलीचे माजी खासदार हेमंत पाटील हे हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष आहे. त्यांना मंत्रिपदाचा दर्जा देण्यात. आमदार संजय शिरसाट यांची सिडकोच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिन्ही नेत्यांची नाराजी दूर करण्याचा भाग म्हणून या नियुक्त्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.