Aditya Thackeray tweet: महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील राजकारणात सध्या सर्वात चर्चेचा विषय असलेला पक्ष म्हणजे शिवसेना. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पक्षप्रमुख पदी सध्या त्यांचे पुत्र आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विराजमान आहेत. शिवसेना हा महाराष्ट्रातील एक मोठा पक्ष आहे. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे राज्यातील ४० आमदार उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ विविध महानगरपालिकांचे माजी नगरसेवक देखील शिंदे गटाला पाठिंबा देत आहेत. शिवसेना नक्की कोणाची.. उद्धव ठाकरेंची की शिंदे गटाची.. अशी चर्चाही सुरू आहे. तशातच आदित्य ठाकरेंच्या एका ट्वीटने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी वेगळा गट तयार केल्याचे ते सांगतात. तसेच, महाविकास आघाडीत राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांवर बोलण्यास निर्बंध येत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले. या साऱ्या मुद्द्यांना आदित्य ठाकरे यांनी सणसणीत उत्तर देत एक ट्वीट केले. बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेली शिकवण आणि उद्धव ठाकरे यांनी दिलेले शिक्षण लक्षात असल्याचे त्यांनी दाखवून दिले. गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून आदित्या यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आणि "माझ्या गुरूंसोबत, सदैव" असे कॅप्शनही दिले.
एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. राऊत यांच्या टीकेतील तीव्रता पाहून अनेक शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. तशातच आता गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेतील नगरसेवक, पक्ष पदाधिकारी आणि इतर काही लोक उद्धव ठाकरेंची साथ सोडताना दिसत आहेत. अशा सर्वांनाच आदित्य ठाकरेंनी आपल्या ट्वीटमधून अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.