मुंबई - विधानसभा निवडणुकीपासूनच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना भावी मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करण्यात येत आहे. शिवसेनेकडून राज्यात काढण्यात आलेली जन आशीर्वाद यात्रा त्याचाच भाग होती. मात्र राज्यातील स्थिती पाहता, आदित्य ठाकरे यांना पक्षसंघटनेतील अनुभव कमी पडत असल्याचे जाणवत आहे.
विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने कुणालाही स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यातच युतीच्या जागा कमी झाल्या आहे. भाजपसह शिवसेनेच्या जागा घटल्या आहेत. मात्र याचा शिवसेनेला फायदाच होताना दिसत आहे. भाजप बहुमतापासून दूर असल्यामुळे शिवसेनेचा भाव वधारला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी युतीत घुसमट सुरू झाली आहे.
भाजपने देवेंद्र फडणवीस यांना गटनेतपदी निवडल्यानंतर शिवसेनेने देखील गटनेतेपदाची निवड केली आहे. शिवसेनेकडून गटनेते एकनाथ शिंदे असणार आहे. त्यामुळे शिंदे हे उद्धव ठाकरे विश्वासू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. विशेष म्हणजे शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव आदित्य ठाकरे यांनी ठेवला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री होण्याची संधी शिंदे यांच्याकडे चालून येईल अशी शक्यता दिसत आहे.
शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदासाठी आदित्य यांच्याऐवजी ज्येष्ठतेचा निकष असावा असं अनेक नेत्यांना वाटतं. तसेच आदित्य यांना सभागृहाचा फारसा अनुभव नाही, त्यामुळे ज्येष्ठतेला संधी द्यावी, असा मतप्रवाह शिवसेनेत आहे. एकूणच मोठ्या पदासाठी आदित्य यांचा अनुभव कमी पडतोय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.