मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सबकुछ शरद पवारच हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. शरद पवारांचा काळ संपला आता माझा काळ सुरू झाला म्हणणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निकालाच्या आठ दिवसानंतरही सत्ता स्थापनेसाठी दिल्लीच्या वाऱ्या करत आहेत. त्यातच शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस एकत्र येत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. यामुळे शिवसेना आणि शरद पवार यांची जवळीक वाढत आहे. याचा शिवसेनेला फायदाच होईल अशी सध्याची स्थिती आहे.
आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू तर शरद पवार आणि बाळासाहेब हे चांगले मित्र होते. आता या मैत्रीला उद्धव ठाकरे वेगळ्या उंचीवर नेणार की, पुन्हा भाजपसोबत घरोबा करणार हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. मात्र यावेळी ठाकरे कुटुंबातील व्यक्ती निवडणूक लढवून सभागृहात दाखल झाली आहे. आदित्य ठाकरे यांनी वरळीतून निवडणूक लढवली असून ते आमदार झाले आहेत.
दरम्यान शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद सुरू झाला आहे. शिवसेना 50-50 च्या फॉर्म्युल्यावर अडून बसली आहे. तर भाजप मुख्यमंत्रीपद आणि काही महत्त्वाची पदे आपल्याकडेच ठेवण्यावर ठाम आहे. अशा स्थितीत शिवसेनेची राष्ट्रवादीसोबत बोलणी सुरू आहे. तर काँग्रेसने पवार मुख्यमंत्री होणार असतील तर आपला पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्याकडे येऊ शकते.
यात काही तथ्य नसलं तरी असं झाल्यास, आदित्य ठाकरे यांना शरद पवारांच्या तालमीत तयार होण्याची संधी मिळणार आहे. पवारांनी आधीच आपला नातू रोहित पवार यांना विधानसभेत पाठवले आहे. त्याचवेळी आदित्यही सभागृहात दाखल झाले आहे. जर पवार राज्याच्या राजकारणात सहभागी झालेच तर याचा सर्वाधिक फायदा आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांना होऊ शकतो. त्याचे कारण म्हणजे दोघांना सभागृहाचे कामकाज आणि पवारांच्या अनुभवाचा आपल्या राजकीय भवितव्यासाठी फायदा होऊ शकतो.