मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं जाहीर कौतुक केलं आहे. आदित्य ठाकरेंबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकरचंही कौतुक केलं. आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी आज सकाळीच मुंबईत स्वत: झाडू हाती घेऊन बँडस्टँड परिसरात साफसफाई केली होती. मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात आज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलासह सहभाग घेतला. यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित होते. या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बँडस्टँड परिसरात साफसफाई केली.
आदित्य ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी स्वत: ट्विट करुनही, स्वच्छतेसाठीचा संदेश दिले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या दोघांचं कौतुक केलं. 'माझा तरुण मित्र आदित्य ठाकरे यांनी स्वत:हून स्वच्छता ही सेवा या अभियानात सहभागी होऊन, मुंबईत साफसफाई केली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो', असं ट्विट मोदी यांनी केलं आहे. 'स्वच्छता ही सेवा' या अभियानात तरूणांच्या वाढत्या सहभागाचा आनंद असल्याचं मोदींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे. आपली युवा शक्ती भारत स्वच्छ करेल, असंही मोदी म्हणाले आहेत.
मास्टर ब्लास्टरचा 'स्वच्छता ही सेवा' अभियानात सहभागमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, मुलगा अर्जुन तेंडुलकर तसंच युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्यासोबत आज पहाटे पाच वाजता हाती झाडू घेऊन स्वच्छता केली. या सर्वांनी मुंबईतील वांद्रे बॅण्डस्टॅण्ड परिसरात साफसफाई केली. प्रत्येक नागरिकाने आपला देश हे आपलं घर समजून स्वच्छ करावं, असं आवाहन सचिन तेंडुलकरने यावेळी केलं. भारताला आपण माता म्हणतो, मग आपला देश अस्वच्छ कसा ठेवू शकतो? असं सांगत सर्वांनीच स्वच्छता मोहिमेत सहभाग घेण्याचं आवाहनही सचिनने केलं. चौपाटीवर एवढी घाण आहे. यावर विश्वासच बसत नाही. चौपाटीवर प्रत्येक ठिकाणी कचरा दिसत आहे. या स्वच्छता मोहिमेमुळे फक्त देशच स्वच्छ होणार नाही. तर देश आरोग्यदायी होईल, असं सचिननं सांगितलं. आपल्या घरात कोणी कचरा टाकत नाही. आपण घराच्या बाहेर कचरा टाकतो. त्यामुळे आपण कचरा पेटीतच कचरा टाकावा. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कचरावाले कचरा साफ करतात असं आपण म्हणतो. पण तो कचरावाला नसतो तर तो सफाईवाला असतो. आपणच कचरावाले आहोत, असंही सचिननं यावेळी बोलताना सांगितलं.