मुंबईः राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीचंच सरकार स्थापन होणार हे निश्चित झालं आहे. महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. त्याच पार्श्वभूमीवर 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेचं विशेष सत्र आज बोलावण्यात आलं असून, नवनिर्वाचित आमदारांना शपथ देण्यात आलं आहे.शपथ ग्रहण समारंभात भाग घेण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार विधानसभेत पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळेसुद्धा विधानसभेच्या गेटवर उभ्या राहून येणाऱ्या आमदारांचं स्वागत करत आहेत. त्याच दरम्यान आदित्य ठाकरेंनी विधानसभेत प्रवेश केला असता त्यांनी सुप्रिया सुळेंची गळाभेट घेतली. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांनाही आलिंगण देत त्यांचं स्वागत केलं आणि म्हणाल्या दादा शुभेच्छा, त्यामुळे शरद पवार यांच्या कुटुंबातील वाद जवळपास संपल्यात जमा असल्याचीही चर्चा आहे.
- कुठे जल्लोष, तर कुठे शांतता...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. अल्पमतातील सरकार अखेर पडले, अशी चर्चा त्यांच्यात होती. आमच्याकडेच बहुमत असून सत्याचा विजय झाल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मुंबईतील अनेक ठिकाणी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. तर दुसरीकडे भाजपच्या गोटात शांतता असल्याचे पाहायला मिळाले.