मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांना लॉन्च करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. आदित्य यांच्यासाठी वरळी विधानसभा मतदार संघात खेळपट्टीही निर्माण करण्यात येत आहे. नुकतेच महाराष्ट्र दौरा करून परतलेले आदित्य ठाकरे यांनी 'आरे'तील कारशेडच्या मुद्दावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. परंतु, यामुळेच तेच टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीमधील २७०२ झाडं कापण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र या मुद्दावरून शिवसेना आणि भाजपामध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील शिवसेनेने झाडं कापण्याच्या प्रस्तावाला विरोध केला असून भाजपाने पाठिंबा दर्शवला आहे.
दरम्यान युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोडीला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. यावरून आदित्य यांच्यावर टीका होत आहे. एकीकडे सत्तेत आणि दुसरीकडे विरोध करत आदित्य ठाकरे मुंबईकरांना वेड्यात काढत असल्याचे आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी ट्विटवरुन केला आहे. या संदर्भात ट्विट करून त्यांनी #PappuThackeray हा हॅशटॅग वापरला. हा हॅशटॅग सोमवारी ट्विटवर ट्रेण्डमध्ये आला होता.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली होती. देशातील जनतेने राहुल गांधी यांना मतदान केले तर सत्तेत कार्टुन नेटवर्क येईल, असं म्हटले होते. मात्र आता आदित्य ठाकरे यांच्यावर राज्यातील पप्पू अशी टीका करण्यात येत आहे. सोशल मीडियावर देखील पप्पू ठाकरे म्हणून आदित्य त्यांच्यावर टीका होत आहे.