मुंबई - मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी सर्व पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. त्यातच बुधवारी २३ नोव्हेंबरला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार असल्यानं चर्चेला उधाण आले आहे. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्यामागचं नियोजन सांगितलं नसलं तरी १ दिवसीय दौऱ्यात ते बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.
आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यामुळे ठाकरे गट आगामी महापालिका निवडणुकीची तयारीला सुरुवात केल्याचं बोललं जात आहे. २३ नोव्हेंबर म्हणजे बुधवारी आदित्य ठाकरे एका दिवसासाठी बिहारला जाणार आहेत. या दौऱ्यात आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची सदिच्छा भेट घेणार आहेत. बिहारच्या पटना येथे ते उपमुख्यमंत्री, राष्ट्रीय जनता दल नेते तेजस्वी यादव यांना भेटतील. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई व शिवसेना उपनेते खासदार प्रियंका चतुर्वेदी तसेच काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहतील.
सत्ता गेल्यापासून आदित्य ठाकरे संघटनेत सक्रीयराज्यातील सत्ता गेल्यानंतर आदित्य ठाकरेंनी पूर्णवेळ संघटना बांधणीकडे लक्ष दिले आहे. उद्धव ठाकरे यांना प्रकृतीअभावी जास्त फिरता येत नसल्याने आदित्य ठाकरे पुढाकार घेत आक्रमक रित्या सत्ताधाऱ्यांवर प्रहार करत आहेत. बंडखोर शिंदे गटातील नेत्यांच्या मतदारसंघात आदित्य ठाकरेंनी दौरे करत त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या अभ्यासू शैलीने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. त्यातच आता आदित्य ठाकरे राज्याबाहेर दौऱ्यावर जात असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
या तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमताअलीकडेच भारत जोडो यात्रेत राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांनी गळाभेट घेतली. यानंतर काही अंतर आदित्य ठाकरे यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रेत सोबत केली. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले होते की, देशात संविधान आणि लोकशाही चिरडली जात आहे. ते वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. लोकशाहीसाठी दोन वेगवेगळे पक्ष एकत्र आले त्यात चुकीचे काय? अशी विचारणा करत, राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे या दोन तरुण नेत्यांमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. हे दोन तरुण नेते देशात ऊर्जा निर्माण करतील, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"