मुंबई - संजय राऊत काय म्हणतात त्याला महत्त्व नाही. युतीचं सरकार अडीच वर्ष पूर्ण क्षमतेने चालणार असून पुन्हा सुद्धा हेच सरकार राज्यात येईल. आदित्य ठाकरेंचा झंझावात नाही. बीडकीनच्या बसस्टँडवर ही रॅली होती. कुठलाही प्रतिसाद नव्हता. आदित्य ठाकरे काय बोलणार, त्यांना बघण्यासाठी लोकं आली होती. वेळ आल्यावर लोक कुणाच्या बाजूने आहेत हे दाखवून देऊ असा इशारा शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी दिला आहे.
संदीपान भुमरे म्हणाले की, बहुतांश पदाधिकारी बाळासाहेबांचे विचार घेऊन आमच्याकडे आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा महाराष्ट्र दौरा काही दिवसांत सुरु होईल. तेव्हा झंझावात काय असतो ते दिसेल. संजय राऊत रोज काही ना काही आरोप करतात, बोलत राहतात. खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात. संदीपान भुमरे चटणी-भाकर खाऊन आमदार झालाय, वडापाववाला नाही. राऊतांचा तोल ढासळलाय. ते कुणासमोर काय बोलतील सांगता येत नाही. २५ वर्ष शिवसेना वाढीसाठी आम्ही प्रयत्न केले. पहिल्यांदा आमदार झालो आणि मंत्री बनवलं असं नाही असं सांगत भुमरे यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला.
तसेच गद्दार कोण याचं उत्तर आदित्य ठाकरेंना लवकर देऊ. आम्ही शिवसेना सोडली नाही. आम्ही गद्दारी केली नाही. खरे गद्दार हेच आहेत. ज्यांनी विधानसभेला आमच्याविरोधात काम केले त्यांनासोबत घेऊन आदित्य ठाकरे फिरू लागले. हेच दौरे दोन वर्षापूर्वी काढले असते तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती. धनुष्यबाण आम्हालाच मिळणार आहे. खरी शिवसेना आमची आहे. बहुमत आमच्याकडे आहे. त्यामुळे जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा जागा निवडून आणू दाखवू. रॅली काढून भावनिक होऊन चालत नाही. गेली दोन अडीच वर्ष आदित्य ठाकरेंना पैठणची बैठक लावा असं सांगितले. परंतु ती बैठकही लावली नाही. सत्ता असताना येऊ शकले नाही आता येऊन काय करणार आहे? जनतेची कामे नाही झाली तर आम्ही जनतेसमोर जाऊ शकत नाही त्यासाठी आम्ही उठाव केला आहे असा टोलाही संदीपान भुमरे यांनी आदित्य ठाकरेंना लगावला आहे.