मनमाड (नाशिक) - एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील आमदार आणि खासदारांनी मोठ्या प्रमाणावर बंडखोरी केल्याने सध्या शिवसेनेत मोठी फूट पडलेली दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी या बंडखोरांना आव्हान देत त्यांच्या मतदारसंघांमधून शिवसंवाद यात्रा सुरू केली आहे. दरम्यान, आज नाशिक दौऱ्यावर असलेल्या आदित्य ठाकरे यांनी मनमाडचा दौरा केला. आदित्य ठाकरेंच्या या दौऱ्याआधी मनमाडचे आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांची भेट घेणारच, असं आव्हान दिलं होतं. त्याला आता आदित्य ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.मनमानमध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, मी आता स्वत: काही उत्तरं देत बसणार नाही आहे. कारण गद्दार नसते तर उत्तरं दिली असती. मात्र गद्दारांमध्ये प्रश्न विचारायची हिंमत नसते आणि त्यांची प्रश्न विचारण्याची लायकीही नसते. प्रश्न विचारण्याआधी आधी तुम्ही गद्दारी का केलीत? त्याचं उत्तर द्या, असे आव्हान आदित्य ठाकरे यांनी सुहास कांदे यांना दिलं आहे.
तसेच एकनाथ शिंदे हे पाठीत खंजीर खुपसून मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी गद्दारी का केली हे कळलेच नाही. मात्र गद्दारांचं हे सरकार फार दिवस टिकणार नाही, हे सरकार लवकरच कोसळेल, असा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला.
महाविकास आघाडी सरकारनं खूप चांगलं काम केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंचा देशातील पाच उत्कृष्ट मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश होता. कोरोनाकाळातील त्यांच्या कामाचं जगभरातून कौतुक झालं होतं, असेही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.