मुंबई - गेल्यावेळी विधानसभा निवडणूक वेगवेगेळे लढवत, पुढे भाजप-शिवसनेने युती करत सत्तास्थापन केली होती. तर आगामी निवडणुकीत सुद्धा युती होणार असल्याचे दोन्ही पक्षातील नेते दावे करत आहे. मात्र असे असतानाही युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे आपल्या प्रत्येक सभेतून अप्रत्यक्षरीत्या भाजपवर टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सत्ता व युती हवी पण भाजपवर सुद्धा टीका करण्याची संधी सोडायची नाही. अशा आदित्यांच्या फॉर्म्युल्याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
गेली पाच वर्ष शिवसेना ही भाजप सोबत सत्तेत होती. मात्र सत्तेत असूनही भाजपवर टीका करण्याची कोणतेही संधी सेनेन सोडली नव्हती. लोकसभा निवडणुका एकत्र लढवणारे हे दोन्ही पक्ष आता विधानसभा सुद्धा एकत्र लढवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र दुसरीकडे आदित्य ठाकरे हे शेतकरी कर्जमाफी व इतर मुद्यावरून भाजपवर अप्रत्यक्षरीत्या टीका करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सत्ता हवी त्याचबरोबर भाजपसोबत युती पण करायची आणि पुन्हा त्याच भाजपवर टीका सुद्धा करायची असा आदित्यांचा फॉर्म्युला चर्चेचा विषय बनला आहे.
सेनेकडून जरी भाजपवर टीका केली जात असली तरीही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या प्रत्येक सभेत युतीचा उल्लेख करत असल्याचे दिसत आहे. जनतेचा जनादेश घेऊन जात असून पुन्हा युतीची सरकार आणणार असल्याचे ते आपल्या सभेत सांगत आहे. तर राज्यात झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचे आकडे फडणवीस सांगत असताना, दुसरीकडे आदित्य ठाकरे मात्र अजूनही शेतकऱ्यांना पूर्णपणे कर्ज माफीचा लाभ मिळू शकत नसल्याचा दावा करत आहे.
नुकतेच सामनामधून शिवसेनेने देशात निर्माण झालेल्या आर्थिक मंदी आणि बेरोजगारीवरून सरकारवर जोरदार टीका केली होती. मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटबंदीच्या निर्णयात असल्याची टीका सामनामधून करण्यात आली होती. त्यामुळे सत्तेत राहून सुद्धा भाजपवर टीका सेनेकडून सुरूच आहे. त्यातच आता आदित्य यांच्या नवीन फॉर्म्युल्याची जोरदार चर्चा आहे.