- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेच्या (एमडीएफए) अध्यक्षपद निवडणूकीमध्ये एकतर्फी वर्चस्व राखताना सहज बाजी मारली. सध्या एमडीएफएचे चेअरमन असलेले आदित्य यांची आता, अध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित झाली आहे. एकूण २७ उमेदवार या निवडणूकीमध्ये विजयी झाले असून यामध्ये आदित्य ठाकरे पॅनलने एकहाती दबदबा राखला.या निवडणुकीमध्ये एकूण झालेल्या १५४ मतांपैकी १४७ मते आदित्य ठाकरे यांच्या बाजूने पडली. यावेळी, एकूण १५९ जणांनी मतदान केले, त्यापैकी १५४ मते वैध ठरली. आदित्य यांच्यानंतर सुधाकर राणे यांनी सर्वाधिक १३८ मते मिळवली. जॉन अल्मेडा, मोहम्मद सलीम अन्सारी आणि सुझान चौधरी यांनी प्रत्येकी १३३ मते मिळवली. तसेच डॅरेल डिसूझा (१३२), सेल्वाडोर डिसूझा (१३२), रायन मेनेझेस (१३२), जांकिटो डिसिल्वा (१३१), हेन्री पिकार्डो (१३१), विलास राणे (१३१) आणि सी. के. शेट्टी (१३१) यांनीही बाजी मारली. त्याचप्रमाणे, अँथनी रॉड्रीग्ज, सुरेश बंजान, गणेश माडकर, सलीम अहमद अन्सारे, फरहान बट्ट, फिरमीन डिसूझा, अजित सावंत, कोनार्ड परेरा, नासिर अन्सारी व दिगंबर कांडरकर यांनीही या निवडणूकीत विजय मिळवला.इतर पदांची घोषणा पुढील बैठकीतअध्यक्ष म्हणून आदित्य यांच्या नावाची केवळ औपचारिकता शिल्लक असली, तरी एमडीएफएच्या इतर पदांवर कोणाची निवड होणार याची घोषणा संघटनेच्या पुढील बैठकीमध्ये होईल. चार उपाध्यक्ष, चार सहाय्यक सचिव, एक सचिव आणि एक खजिनदार असे स्वरुप असलेल्या समितीवर कोणाची निवड होणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.