ऑनलाइन लोकमत
खामगाव, (जि.बुलडाणा), दि. 04 - तालुक्यातील पाळा येथील आदिवासी मुलीवर अत्याचार प्रकरणी आश्रम शाळेची पाहणी करण्यासाठी जात असलेल्या आदिवासी विकास मंत्र्यांसह, भाजपनेत्यांना स्थानिक आदिवासींच्या रोषाला शुक्रवारी सामोरे जावे लागले. यावेळी खामगाव-पाळा मार्गावर अंत्रज येथे आदिवासी नागरीकांनी मंत्र्यांचा ताफा अडविला. त्यापुर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनीही मंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले.
खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्व. निंबाजी कोकरे आश्रम शाळेतील अल्पवयीन विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा, कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर, माजी मंत्री तथा भाजपनेते एकनाथ खडसे, आमदार अॅड. आकाश फुंडकर यांच्यासह भाजपचे स्थानिक पदाधिकारी पाळा येथील आश्रम शाळेवर जात होते. दरम्यान, अंत्रज फाट्यावर तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिका-यांनी मंत्री आणि भाजपच्या नेत्यांना काळे झेंडे दाखविले. त्यानंतर स्थानिक आदिवासींनी मंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडविला. सदर घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी आदिवासी विकास मंत्री ना. सावरा यांनी शासनाकडून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. त्यामुळे नागरीकांनी रास्ता रोको मागे घेतला.
आश्रम शाळेत केली नारेबाजी
पाळा येथील आश्रम शाळेची पाहणी करीत असताना स्थानिक नागरीक तसेच विविध ठिकाणावरून आलेल्या आदिवासींनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आदिवासी विकास मंत्री विष्णु सावरा यांच्यासह पालकमंत्री फुंडकर, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वाहनांचा ताफा आश्रम शाळेतून निघून गेल्यावर आदिवासी विकासमंत्री व भाजपा शासनाविरूध्द आश्रम शाळेच्या परिसरात आदिवासी नागरीकांकडून नारेबाजी करण्यात आली.