नागपूर : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संबंधी दिलेला स्थगन प्रस्ताव न स्वीकारल्याने विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विरोधी पक्षाने पक्षपाताचा आरोप करीत सभात्याग केला.
विरोधी पक्षाच्या सदर स्थगन प्रस्तावाच्या सर्व सूचना नाकारत असल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. विरोधक अध्यक्षांच्या आसनासमोर आले. विनंतीनंतरही अध्यक्षांनी परवानगी न दिल्यामुळे नाराज सदस्यांनी अध्यक्षांवर पक्षपाताचा आरोप करत घोषणाबाजी केली.
गोसेखुर्द धरणाचे कॉन्ट्रॅक्टर रामा राव यांचे काम निकृष्ट असल्याबाबत त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्या रामा राव यांच्यासोबत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे विमानाने तिरुपतीला सहपरिवार गेले होते. त्याचा सर्व खर्च रामा राव यांनी केला. आर्थिक लाभासाठी हा खर्च करण्यात आला. त्या पाश्र्वभूमीवर आम्ही विरोधी पक्षाने नियम 93 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला होता, असे सभागृहाबाहेर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. अध्यक्ष हे भाजपाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागत असल्याची टीकासुद्धा त्यांनी केली.
अण्णा जोशी यांना आदरांजली
भाजपाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे माजी उपाध्यक्ष लक्ष्मण सोनोपंत ऊर्फ अण्णा जोशी यांना गुरुवारी विधानसभेत आदरांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधातील शोकप्रस्ताव सादर केला. अण्णा जोशी जनसंघाचे जुने नेते होते. त्यांचा स्वभाव मनमिळावू होता. केवळ भाजपाच नव्हे तर सर्व पक्षांसोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्याकडून आम्हाला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, राष्ट्रवादीचे अजित पवार, विधानसभेचे सदस्य गणपत देशमुख, संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट, मेघा कुलकर्णी आणि विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही आदरांजली अर्पण केली.
जमाते-उलेमा हिंद संघटनेवर बंदीची मागणी
जमाते-उलेमा हिंद या संघटनेचा कुख्यात छोटा शकील याच्याशी संबंध आहे. या संघटनेतर्फे दहशतवादी कृत्यातील आरोपीला न्यायालीयन मदत केली जाते. तेव्हा या संघटनेबाबत तातडीने चौकशी करून बंदी घालण्यात यावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेच्या प्रस्तावावर ते बोलत होते.
पोलिसांसाठी गृहनिर्माण योजनेची मागणी
नागपूर : राज्यातील पोलिसांसाठी गृहनिर्माण योजना लागू करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे सदस्य मंगलप्रताप लोढा यांनी गुरुवारी विधानसभेत केली. कायदा व सुव्यवस्थेवरील चर्चेत ते बोलत होते. पोलीस सुरक्षेसाठी त्याला आपल्या घरादाराकडे दुर्लक्ष करावे लागते; अशा वेळी त्याला शासनाने साथ देण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले.
च्महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात दलितांवरील अत्याचार प्रचंड वाढले आहेत. त्यासाठी अॅट्रॉसिटीचा कायदा आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही. दलितांना योग्य न्याय देण्याच्या उद्देशाने अॅट्रॉसिटी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसच्या सदस्या वर्षा गायकवाड यांनी केली.
च्खैरलांजी ते जवखेडे हत्याकांडार्पयत बौद्ध समाजावर होत असलेल्या अन्यायावर त्यांनी भाष्य केले. अॅट्रॉसिटीचे प्रकरण हाताळण्यासाठी जिल्हास्तरावर न्यायालय, मोबाईल पोलीस ठाणो आणि महिलांसाठी हेल्पलाईन सुरू करण्याची मागणी त्यांनी केली.