अविनाश कोळी -- सांगली --डोळ्यावर झापड येत असतानाही राबणारे कर्मचारी, सतत आढावा घेणारे अधिकारी, संपूर्ण जिल्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सतत सुरू असलेला संपर्क, कार्यालयात खणाणत असलेले फोन, मतदान झाले म्हणून सुस्कारा टाकण्याऐवजी लगेच तासाभराची विश्रांती घेऊन सुरू झालेली मतमोजणीची तयारी, असे चित्र आज सर्वत्र दिसून आले. अविश्रांत सेवेच्या तासांचे अर्धशतक पूर्ण करूनही आज निवडणूक यंत्रणा पुन्हा उत्साहाने राबताना दिसून आली. विधानसभा निवडणुकीसाठी यंदा शांततेत मतदान झाले. यामागे जवळपास १५ हजार कर्मचाऱ्यांचे कष्ट कारणीभूत आहेत. मतदानाच्या स्लिपा वाटण्याच्या कामापासून मतदान प्रक्रिया संपेपर्यंत आणि पुन्हा मतमोजणीच्या तयारीपर्यंतच्या कामात कर्मचाऱ्यांनी अखंड ५0 तासांहून अधिक काळ केलेल्या कामाचा हा परिणाम आहे. लोकसभेतील काही चुकांची दुरुस्ती करीत उत्कृष्ट व्यवस्थापकीय कौशल्याचे उदाहरण देत या यंत्रणेने शिस्तबद्ध पद्धतीने विधानसभेच्या मतमोजणीचा महत्त्वाचा टप्पा पार केला. जिल्ह्याच्या तब्बल ८ हजार ५७७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळातील सर्व घडामोडींवर नियंत्रण ठेवण्यासाठी राबविण्यात आलेल्या यंत्रणेला यश मिळाले. तरीही मोकळा श्वास न घेता मतमोजणीचा टप्पाही यशस्वीपणे पूर्ण करण्याचे ध्येय यंत्रणेने बाळगले आहे. त्यामुळेच अविश्रांत सेवा अजूनही सर्वत्र सुरूच आहे. जिल्ह्याच्या दूरवरच्या भागासाठी नियुक्त कर्मचारी तर १३ आॅक्टोबरच्या रात्रीपासून निवडणूक कामात व्यस्त झाले आहेत. अशा अनेक कर्मचाऱ्यांनी ६0 तासांहून अधिक काळ सेवा बजावली आहे. मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर मतदानाचे आकडे संकलित करून पुन्हा त्याची छाननी करून कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्यासाठी गुरुवारची पहाट उजाडली. जिल्हाधिकारी कार्यालय पहाटे पाच वाजेपर्यंत सुरूच होते. यंत्रणेच्या एकत्रित चांगल्या कामामुळे मतदान प्रक्रियेचे काम चांगले झाले. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना मी धन्यवाद देतो. उत्तम काम करणाऱ्यांना यापुढेही प्रोत्साहन देण्यात येईल. मतदानाप्रमाणेच आता मतमोजणीचीही प्रक्रिया आमचे कर्मचारी यशस्वीपणे पार पाडतील, याची खात्री आहे. - दीपेंद्रसिंह कुशवाह, जिल्हाधिकारी, सांगली४मतदार जागृती अभियानाचा एक भाग म्हणून मोबाईलवर सर्वांना मेसेज पाठविण्याचा उपक्रम जिल्हा प्रशासनाने राबविला. या कालावधित तब्बल १0 लाख ७२ हजार मेसेज पाठविण्यात आले. सांगलीत रजिस्टर झालेल्या सर्व मोबाईलधारकांना असे संदेश मिळाले आहेत. त्रुटींची दुरुस्ती--लोकसभा निवडणुकीत मतदारयाद्यांबाबत निर्माण झालेल्या काही त्रुटी दूर करून प्रशासनाने विधानसभा निवडणुकीत त्यात अनेक बदल केले. मतदारांना वारंवार नावाची खातरजमा करण्याबाबतची सूचना देण्यात आली. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत तक्रारी झाल्या नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले प्रोत्साहन, त्यांच्यावर व्यक्त केलेला विश्वास आणि त्या विश्वासास पात्र रहात कर्मचाऱ्यांनी अखंडपणे घेतलेली मेहनत यामुळेच मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. या गोष्टीचे श्रेय कोणा एकट्याचे नाही. सर्व टीमवर्कमुळे घडले आहे. अजूनही कर्मचारी अविश्रांत राबत आहेत. - मौसमी बर्डे, जिल्हा निवडणूक अधिकारी, सांगलीरात्री दहा वाजताही स्लिपा पोहोच४मतदानाच्या स्लिपा वाटण्याचे कामही ज्या कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आले होते, त्यातील बहुतांश कर्मचाऱ्यांनी हे काम इमाने इतबारे पूर्ण केले. काहीठिकाणी स्लिपा मिळाल्या नसल्याच्या तक्रारी असल्या तरीही, लोकांनी झालेल्या चांगल्या कामाचेही कौतुक केले. विश्रामबाग येथील एका डॉक्टरांना रात्री साडेनऊ वाजता मतदान स्लिपा मिळाल्या. त्यांनी या गोष्टीबद्दल रात्रीच जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना फोन करून या गोष्टीचे कौतुक केले. ज्यांना स्लिपा मिळाल्या नाहीत, अशा मतदारांनीही कॉल करून तक्रारी केल्या, परंतु यंदा त्याचे प्रमाण खूप कमी होते. २२00 मतदारांचे कॉल...मतदारांसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिल्याने एका कॉलवर मतदारांना त्यांचे नाव, यादी, भाग क्रमांक आणि अन्य तपशील उपलब्ध केला जात होता. या क्रमांकाचा लाभ या निवडणूक कालावधित तब्बल २ हजार २00 लोकांनी घेतला. या सर्व मतदारांना त्यांचे समाधान होईपर्यंत माहिती देण्याचे काम निवडणूक कार्यालयाने केले. मतदारांना ही सेवा देण्यासाठी निवडणूक कार्यालयात सकाळी ९ ते रात्री १0 वाजेपर्यंत कर्मचारी राबत होते. मतदान केल्याचे दर्शविणारी छायाचित्रे जिल्हा प्रशासनाने मागविली होती. अशी एक हजारावर छायाचित्रे जिल्हा प्रशासनास प्राप्त झाली आहेत. उत्कृष्ट छायाचित्रांना बक्षिसे देण्यात येतील, असे जिल्हाधिकारी कुशवाह यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. कर्मचाऱ्यांचा होणार गौरवप्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव जिल्हा प्रशासनातर्फे केला जाणार आहे. अशा कर्मचाऱ्यांसाठी प्रशिस्तीपत्र तयार करण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीतही याचपद्धतीने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले होते. जे कर्मचारी नियुक्त ठिकाणी गैरहजर राहिले असतील किंवा कामात त्यांनी अकारण हलगर्जीपणा केला असेल तर, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची भूमिकाही प्रशासनाने स्पष्ट केली आहे. आॅन ड्युटी ७२ तास..!पोलिसांची कर्तव्यपूर्ती : मतदान केंद्रावरच मुक्कामसचिन लाड -- सांगलीचार महिन्यांपूर्वी झालेली लोकसभा निवडणूक, त्यानंतर गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव यासाठीच्या सततच्या बंदोबस्तामुळे पोलिसांना उसंत मिळाली नसतानाच, तोपर्यंत विधानसभेची निवडणूक लागली. या निवडणुकीत प्रचाराला वेग आल्यानंतर पोलिसांना तब्बल १६ तासांपर्यंत कर्तव्य बजावावे लागले. मतदानापूर्वी ते मतदान होईपर्यंत तब्बल ७२ तास त्यांना अविश्रांत ड्युटी करावी लागली. पोलिसांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही.निवडणुकीची जबाबदारी जिल्हा प्रशासन व पोलीस यंत्रणेवर असते. विशेषत: पोलिसांनाच अधिक राबावे लागते. १३ आॅक्टोबरलाच सर्व पोलिसांना बंदोबस्ताचे वाटप करण्यासाठी बोलावून घेण्यात आले होते. त्यानंतर बंदोबस्ताचे वाटप करण्यात आले. त्याचदिवशी सकाळी दहा वाजता नियुक्त केलेल्या मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी त्यांना रवाना करण्यात आले होते. १५ आॅक्टोबरला सायंकाळी सहा वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. मतदान यंत्रे सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी पुन्हा पोलिसांची मदत घेण्यात आली. रात्री अकरानंतर पोलीस बंदोबस्तातून मोकळे झाले.तत्पूर्वी प्रचाराचा वेग वाढल्याने पोलिसांवर कामाचाही ताण वाढलेला होता. त्यांची दिवसभर धावपळ होत आहे. प्रचाराच्या सभा खुल्या मैदानात झाल्याने, सभेपूर्वी त्यांना मैदानात उन्हात उभे रहावे लागले. अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या खासगी कामासाठी वेळ न मिळाल्याने त्यांना कामे पुढे ढकलावी लागली होती. जिल्ह्यातील दुर्गम भागात कर्तव्य बजावणाऱ्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना घरीही जात आले नाही. विजयादशमीचा सणही त्यांना कटुंबासोबत साजरा करता आला नाही. मतदानापूर्वी चार दिवस अगोदर २४ तास नाकाबंदी सुरू होती. बंदोबस्त राहणारजिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या अपुरी असल्याने पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या व रजा बंद केल्या होत्या. त्या पुढील आठवड्यात सुरु होण्याची शक्यता आहे. गुजरात, चेन्नई, इंडो तिबेटियन व दौंड या भागातून बंदोबस्त मागविला होता. बाहेरुन आलेला हा बंदोबस्त मतमोजणी पूर्ण होईपर्यंत ठेवला जाणार आहे. त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था जिल्हा पोलीस दलाने केली आहे.
प्रशासनाची ड्युटी सलग पन्नास तास...आॅन ड्युटी ७२ तास..!
By admin | Published: October 16, 2014 10:25 PM