मुंबई : अवांतर वाचन हे निरंतर शिक्षण असते. त्याद्वारे सशक्त वाचन संस्कृती निर्माण होते व अशाच देशात ज्ञानसत्ता निर्माण होत असते. त्यामुळे राज्यातील सर्व शालेय विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त गोष्टींची तसेच माहितीपर पुस्तके वाचावीत, असे आवाहन नियोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर दरम्यान ज्या विद्यार्थ्यांनी किमान ५० पुस्तके वाचली असतील त्यांना अभिनंदनपर असे छानसे कौतुकाचे पत्र पाठविणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या शाळा आणि सर्व प्रकारच्या माध्यमातील विद्यार्थी पात्र ठरतील.गेले वर्षभर राज्यातील शिक्षक, विद्यार्थ्यांना संमेलनाध्यक्ष उपक्रमासाठी आवाहन करीत आहेत. यामधून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागून त्यांचे अवांतर वाचन वाढण्यास मदत होईल. तिसरी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम असूनडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ६ डिसेंबरला याचे आयोजन करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बालवयापासून वाचनाची आवड होती. वाचन व व्यासंगामुळे ते एवढे मोठे महामानव झाले व त्यांनी भारतीय घटनेची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या स्मृतीला विद्यार्थ्यांनी वंदन करून वाचनाची आवड स्वत:ला लावून घ्यावी, असे आवाहन देशमुख यांनी विद्यार्थ्यांना केले आहे. तसेच शिक्षकांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहित करावे आणि अशा विद्यार्थ्यांची माहिती द्यावी, असे आवाहन त्यांनी शाळांनाही केले आहे.‘त्या’ विद्यार्थ्यांना देणार आणखी ५ पुस्तकेसर्वाधिक पुस्तके वाचणाºया १० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. संमेलनाध्यक्ष त्यांना आणखी प्रत्येकी ५ पुस्तके भेट देतील. वाचनातून सक्षम पिढी घडविण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागेल, असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला.
५० पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्यांचे साहित्य संमेलनाध्यक्ष पत्र लिहून करणार कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2018 3:31 AM