गडचिरोली : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेलगतचा राज्यपालांचा दत्तक असलेला भामरागड तालुका कुपोषणाच्या विळख्यात सापडला आहे. तालुक्यात १२९० बालके कुपोषणाच्या अतिशय गंभीर श्रेणीत आढळले असून आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे. राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या या तालुक्यात कमी वजनाचे ९३१ तर अतिकुपोषित २५९ मुले आढळल्याचे आरोग्य विभागाच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आले आहे.लाहेरी, कोठी, ताडगाव, भामरागड येथे आरोग्य केंद्र आहेत. मात्र येथे वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची ६० टक्क्याहून अधिक पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिक आरोग्यविषयक सोयीसुविधापासून वंचित आहेत. अनेक रुग्णांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले जाते. पालक अशिक्षित व अज्ञानी असल्यानेही अंगणवाडीतही मुलांना दाखल केले जात नाही. परिणामी तालुक्यात कुपोषणाचे प्रमाण सतत वाढत आहे.अशीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यांची असून मे महिन्यात आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्षणात १८ हजार १४२ बालके कुपोषणाच्या गंभीर श्रेणीत असल्याचे आढळून आले आहे. त्यातील ३ हजार ४५७ बालके अतिशय गंभीर अवस्थेत आहे. त्यांना आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य यंत्रणा उदासीन दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
राज्यपालांच्या दत्तक तालुक्यात १,२९० बालके कुपोषित
By admin | Published: July 14, 2015 12:45 AM