कल्याण : डम्पिंग ग्राउंड परिसरात राहणाऱ्या मुलांच्या मदतीसाठी ‘अक्षरगंध’ आणि ‘श्री रेणुका कला मंदिरा’तर्फेझालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बच्चे कंपनीने अगदी धम्माल उडवली. या वेळी सादर झालेल्या नृत्य, गायन, नाट्य, जादूचे प्रयोग अशा एकापेक्षा एक सरस कार्यक्रमांचा बच्चेकंपनी आणि त्यांच्या पालकांनी भरभरून आस्वाद घेतला. या कार्यक्रमातून जमलेल्या निधीमधून डम्पिंग ग्राउंड परिसरातील निवडक मुलांना दत्तक घेण्यात आले.कल्याण डम्पिंग ग्राउंड परिसरातील मुलांनाही इतर मुलांप्रमाणे आयुष्य जगता यावे, त्यांच्या लहान वयात विविधरंगी आनंदाचे क्षण फुलावे, या सामाजिक दृष्टिकोनातून हा कार्यक्रम झाला. तीन वर्षांच्या मुलांपासून तरुण-तरुणींनी यावेळी विविध कला सादर करीत उपस्थितांची मने जिंकली. सध्याचा भीषण दुष्काळ पाहता लहान मुलांनी पावसाची गाणी गात आणि शेतकरी नृत्ये सादर करून ‘पाऊस पडू दे’ आणि ‘पाणीटंचाई दूर होऊ दे’, अशा भावना व्यक्त केल्या. या वेळी सादर झालेल्या ‘क’ला काना ‘का’ या एकांकिकेलाही उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसेच चित्रकार आणि सुलेखनकार नीलेश बागवे यांची बोलकी अक्षरे, ‘अबॅकस’ संस्थेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेली तोंडी आकडेवारी, ‘डिस्कव्हरी आॅफ ब्रेन’च्या अनोख्या प्रयोगालाही उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या शेवटी झालेल्या चार्ली चॅप्लिन मॅजिक शोची मुलांनी मजा लुटली. या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र पवार, उल्का बागवे, सरिता लिमये, सुनीता देसाई, सामाजिक कार्यकर्ते संजीता कुट्टी, स्मिता चौबळ, विद्या धारप, दिनेश देसाई, अरुण देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. कचरावेचक मुलांचे नाटकजूनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात कचरावेचक मुलांचे नाटक सादर करण्यात येईल, अशी माहिती या वेळी कार्यक्रमाचे संयोजक सतीश देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)
डम्पिंग ग्राउंडवरील मुलांना संस्थेने घेतले दत्तक
By admin | Published: April 26, 2016 3:00 AM