पुणे : राज्यातील सर्व आमदारांनी कोणतीही शाळा दत्तक घेऊन शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम राबवून प्रगत करावी, अशा सूचना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणा-या उपक्रमांची माहिती सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांनी आमदारांना द्यावी. तसेच त्यांनी दत्तक घेतलेल्या शाळांची माहिती २९ फेब्रुवारीपर्यंत जमा करून निश्चित करावी, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहेत.राज्याच्या शिक्षण विभागातर्फे प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा प्रगत करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राज्यातील शिक्षण अधिकाऱ्यांनी सुमारे २०० ते ४०० पर्यंत शाळा दत्तक घेतल्या आहेत. या शाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी तसेच विद्यार्थी व शिक्षकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात या अपेक्षेने शाळा दत्तक घेतल्या जात आहेत. त्याच प्रमाणे राज्यातील सर्व आमदारांशी चर्चा करून त्यांना उपक्रमाविषयी माहिती द्यावी, त्याचप्रमाणे त्यांनी दत्तक घेतलेल्या शाळेसमोर दर्शनीभागावर याबाबतचा फलक लावावा. परिसरातील क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी संबंधित शाळेतील १०० टक्के पालक प्रगत होतील यासाठी प्रयत्न करावेत.आमदारांनी दत्तक घेतलेल्या शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांना ग्रामस्तांनी तसेच शिक्षण अधिकाऱ्यांनी सहकार्य करावे. दत्तक शाळेच्या उपक्रमांचे अनुकरण परिसरातील इतर शाळांनी करावे, असेही परिषदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
दत्तक शाळांची निश्चिती २९ फेब्रुवारीपर्यंत करा
By admin | Published: February 24, 2016 1:01 AM